पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्मला मन मोकळं करीत असे. भावाच्या दारात धुणीभांडी घाशीत नि शेतात मरेस्तो कष्ट करीत बसण्यापेक्षा, स्वत:च्या पायावर उभे राहाणे सर्वात सोयीचे असे शकू नेहमी सांगे. निमूने येत्या २/३ वर्षाता पायावर उभे राहावे असे ती म्हणे. एकदा का या भट्टीत आपण शिरलो की पुन्हा सुटका नसते. तिनेच मनस्विनी महिला प्रकल्पाची माहिती निमूना दिली. आपली दु:खी लेक संस्थेत जाणार म्हटल्यावर मातोळे पाटील रागावले. परंतु निर्मलेच्या हट्टापुढे त्यांना हार खावी लागली. आणि निर्मला मनस्विनीत दाखल झाली.

 सरकारच्या .. शासनाच्या वतीने तिचे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. अत्यंत धाडसी आणि कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिकाऱ्याच्या पुढाकाराने प्रकरण न्यायालयात गेले असल्याने, तिच्या मनात आपल्याला नक्की न्याय मिळेल याबद्दल खात्री होती. आम्हीही या प्रकरणी सतत शासकीय वकिलांशी- पी.पी.शी संपर्क साधीत होतो. पण प्रकरण न्यायाधीशांसमोर येत नव्हते. दरम्यान पोलिस अधिकाऱ्याची बदली झाली. आम्ही एकूण अंदाज घेत असताना असे लक्षात आले की बरेच साक्षीदार बदलले होते. वकिलांच्या शब्दातही 'जरतारी' भाषा येऊ लागली होती. अर्धवट शिकलेल्या, त्रासाने खचल्या आहेत, अशा स्त्रिया न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या की खूप एकाकी होतात. त्यांच्यातील सारे धैर्य अक्षरशः गळून जाते. आमची कार्यकर्ती दरवेळी निर्मलाबरोबर लातूरच्या जिल्हा न्यायालयात जात असे. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आले. विरुद्ध पक्षाचा वकील तारीखवारांवर विशेष भर देऊन गोंधळात टाकतो, त्यामुळे घराबाहेरच्या जगाशी अजिबात ओळख नसलेली, अक्षर ओळख नावालाच असलेली बाई फारच भांबावते. वकिलांनी घोटवलेली वाक्ये विसरुन जातात. घडलेल्या गोष्टी आठवेनाशा होतात. शब्दचं उमटत नाहीत. निर्मलाचेही असेच झाले.

 ..... एक दिवस रात्री दारासमोर रिक्षाचा आवाज आला. पाहुणे अगदीच नवे दिसत होते. पायाने लंगडणारे. डोक्याला चष्मा. "येऊ का आत" असे अत्यंत अदबशीरपणे विचारुन घरात आले. ते होते आरोपीचे .... निर्मलाच्या सासरच्या मंडळींचे वकील. त्यांना आमच्याशी अत्यंत महत्वाचे, .. खाजगीत बोलायचे होते. म्हणून ते लातूरहन रिक्षा घेऊन आले होते. मी तात्काळ आमच्या वकिलांना संस्थेत येण्यासाठी निरोप दिला आणि त्या वकिलांना घेऊन संस्थेत गेले. त्या वकिलांचे नांवं आपण काहीही धरुया.

आपले आभाळ पेलताना/५३