पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाताना पायातल्या चपला हातांत धरून डोकीवरचा पदर अंगभर लपेटून किंचित वाकून, बैठकीतून बाहेर पडायचे हा रिवाज. वडिलांनी मुलींना शाळेत बरीक घातले. पण ती 'शहाणी' होईस्तो. म्हणजे मासिक पाळी सुरु होईपर्यंत. थोरली श्यामी सातवीपर्यंत शिकली. पण निमूला सहावीतच नहाणं आलं नि ऐन परीक्षेच्या तोंडावर घरी बसावं लागलं. लगेच धावाधाव सुरू झाली. औशाच्या पोलिस हवालदाराचा मुलगा. त्याचीही पोलिसखात्यात निवड होणार होती. पांढरीत स्वतःचे घर आणि काळीत आठ एकराचं शिवार. सारं छान होतं. भरपूर पैसा लावून पोरगी उजवून सावळे पाटील मोकळे झाले.

 तेरा चवदा वर्षाच्या मुलीला विवाहानंतरचे जीवन नवेच असणार. काही माहीतच नव्हते असे नाही. श्यामी ताईने सांगितले होते, "गाईवर जसा बैल चढतो ना तसेच सारे, त्रास मात्र खूप होतो. पण मग होते सवय हळूहळू" खेड्यातील मुलींच्या भवताली कुत्री, मांजरं, गाढवं, म्हशी, गायी, कोंबडे यांचा कमी का गोतावळा असतो ? त्यातून खूप काही सहजपणे कळत असते. निमुला त्या गोतावळ्यात आपणही असतो हे कळू लागले. पण नवरा पोलिस व्हायच्या आधीच ऐट करी. घरी पिऊन येई. राडीतांड्यावरून पहिल्यां धारेची रोज घरी येत असे. लाडका लेकही बापाबराबर साथीला असे. रोज कोल्हापुरी मसाल्याचं मटण लागे. कधी कधी या साऱ्याची एवढी किळस येई की डोंगरात जाऊन बकाबका ओकावसं वाटे. निमू माहेरी आलेली तिला वाटायचे एक आठवड्याचा एक दिवस व्हावा नि अशा दिवसांचा एक महिना माहेरी राहावे. सासरी गेलेली मुलगी माहेरवाशीण म्हणून घरी आली की तिला खूप मोकळेपणा असे. गावात कुठेही हिंडता येणार ... मैत्रिणीकडे जाता येणार ... शेतात फेरी मारायला आडकाठी नाही.... सारे कसे मोकळे नि छान. पाहाता पाहाता वर्ष निघून गेले.

 लग्नात ११००० रु. रोख, तीन तोळे सोने, वधू वराचे कपडे, मानपान, दोहोकडंचा खर्च, एवढे सारे करूनही निर्मलाच्या सासरच्यांची भूक भागलेली नव्हती. वर्षसणाच्या निमित्ताने मोटारसायकल माग असा लकडा त्यांनी मुलामागे लावला. आणि मग निर्मलाला मारहाण करणे सुरू झाले. सासू-सासरे, नणंद यांचे कुजकट बोलणे तर नेहमीच सहन करावे लागे. निर्मला पैसे आणण्यासाठी माहेरी जाण्याचे नांव काढीत नाही असे

आपले आभाळ पेलताना/४७