पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काळजात घालमेल व्हावी असा अवतार. सतत रडून रडून डोळ्याभोवती काळेपणा आलेला. सूज आलेली. एका डोळ्यात फूल पडले होते. हाताची कोपरे आणि पायाचे गुढगे सततं त्यांवर लोखंडी बता मारल्याने हिरवेनिळे पडलेले होते. मुळात चांगली उंची नि दुहेरी हाडाचा बांधा. पण आता एवढी काटकुळी झाली होती की फुंकर मारल्यावर उडून जावी! तिचा हात मम्मीने हातात घेतला, पाठीवरून हात गिरवला. आणि दोघीचे डोळे भरभरून वाहून लागले. आमच्या नेहमीच्या रीतीनुसार दोनतीन दिवस तिला फारसे प्रश्न विचारायचे नाहीत आणि दिलासा घरातील वातावरणात मिसळून जाण्यास मदत करायची असे ठरले. आणि दोनच दिवसात मनाच्या सगळ्या कड्या उकलल्या. मोकळ्या झाल्या. तिच्या चेहऱ्यावर तरतरी आली. दिलासा घरात आलेली महिला आमच्यात मिसळून जाण्यासाठी सर्वात महत्वाची मदत होते मम्मीची. मम्मीचे नाव गंगाबाई. वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले आणि सालभरात नवरा खर्चला. वैधव्य आले. तेव्हापासून दिराच्या नाहीतर भावाच्या दारात कष्ट करुन, दिल्या अन्नात आनंदी राहायचे ही हजारो वर्षापासून चालत आलेली रीतं गंगाबाईनेही मनोमन पाळली. दुसरे काय होते हातात ? १९७५ चा सुमार. डॉ.लोहिया 'आणीबाणी वासी' होते. १९ महिने गजाच्या आड. आणि नेमक्या त्याच काळात संस्थेला बालसदन चालवण्याची परवानगी मिळाली. माझ्या नजरेने या मम्मीला केव्हाच हेरून ठेवले होते. आणि दिवाळीत गंगाबाई ९ बालकांच्या मम्मी झाल्या. गेल्या वीस वर्षापासून त्या मानवलोक परिवाराच्या मम्मी... मायमाऊली झाल्या आहेत. हजारोंच्या पोटात मम्मीचे प्रेमळ हात पोचले आहेत. आमची अडाणी मम्मी अनुभवातून खूप काही शिकली. अनुभवातून सुदृढ आणि सुजाण झालेला तिचा मायेचा आधार दिलासातील मुलींना अधिक मोकळं करतो. अधिक बोलकं करतो.

 निर्मलाही दोन दिवसात हसू लागली. धिटाईने बोलू लागली. स्वत:ची कहाणी सलगपणे सांगण्याची, त्यातील संगती शोधण्याची समज तिच्यात आली.

 निर्मलेचं घर खाऊन पिऊन टंच. वडिलांच्या दारात बैलबारदाना बांधलेला. पडवीत एक गाय नि दोन म्हशी. वडील ग्रामपंचायतीत निवडून येणारे. बाहेरची बैठक आणि आत अंगण, त्या पलीकडेच स्वैपाकघर, न्हाणी, कणग्यांच्या खोल्या. बैठक नि अंगण यामध्ये जाड चवाळ्यांच्या पोत्याचा पडदा टांगलेला. बायामाणसांनी परगावी.... माहेरी वा सासरी

आपले आभाळ पेलताना/४६