पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक होऊन राहाणाऱ्या मम्मीच्या ओठावर असतात. पण त्यातील काहींची आठवण मात्र तिला नेहमीच येत राहाते,... सतावीत राहाते. निर्मलाची कहाणी अशीच. सतत आठवत राहाणारी. तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न समोर खडे करणारी. कहाणी आडदहा वर्षांपूर्वीची. पण आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहाते.

 ... "भाभी, निर्मला मातोळेला आपल्या दिलासा घरात राहायला यायचेय. तिने मांडव्यांच्या बालवाडीताई सोबत निरोप पाठवलाय. ... आठवते ना निर्मल ? ती औशाची केस. महाराष्ट्र भर गाजलेली. मग काय पाठवू निरोप?" पलीकडून दामिनी, आमच्या मनस्विनी महिला प्रकल्पातील कार्यकर्ती, जिला आम्ही संवादिनी असे म्हाणतो, ती विचारीत होती. खरे तर हा प्रश्न विचारण्याची गरज नव्हती. परंतु आपल्या कोणत्याही कामात, 'व्यक्तिमत्त्वाची' बाब अगदी आतून नको तितकी आणि नकळत मिसळलेली असते. आपण हा उपचार पाळतो. मग त्याचीही सवय होऊन जाते. तो न पाळणे गंभीर बाब ठरते.

 "अगं, तिला प्रवेश देऊन फोन करायचास. गरजू स्त्रीला अर्ध्या रात्री आधार देऊन दिलासा देणारे घर म्हणतो ना आपण ? मग?" माझी ही वाक्यं सुद्धा आता 'ध्वनिमुद्रित' झाल्यासारखी तोंडातून बाहेर पडतात. मी फोन ठेवला आणि माझ्या मनात निर्मलेचा कोरा चेहरा आकारू लागला.

 ...डोक्यावरचे केस पूर्णपणे कापून गोटा केलेला. त्यावर फोड आलेले. खोबणीत जाऊन बसलेल्या डोळ्यातली विलक्षण जिवंत पण बिथरलेली नजर. निर्मलेला पाहाण्यासाठी गावांतल्या अर्ध्याहून अधिक महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात गर्दी करून गेल्या होत्या. महाराष्ट्रातील प्रत्येक वर्तमानपत्रात, तिच्यावर लादलेल्या मृत्यूसमान तुरुंगाची,... सहा महिन्यांच्या अंधारकोठडीची भीषण कहाणी नोंदवली गेली होती. त्या वर्षीच्या गणेशोत्सवात तिची कहाणी सांगणारे करुण देखावे मांडले गेले होते. अशी निर्मला, वडिलांच्या घरून संस्थेत येऊ इच्छित होती. का? ते तर तिचे माहेर होते. तिथेही ती उपरी होती का? दुसऱ्याच दिवशी मोठ्या बहिणीला बरोबर घेऊन ती संस्थेत दाखल झाली. दवाखान्यात होती तेव्हा डोक्याचा पार गोटा होता. गेल्या चार महिन्यात डोईवर थोडे काळे केस आले होते. डोक्यावर पदर घेतला तरच तिच्याकडे बघवत असे. एरवी

आपले आभाळ पेलताना/४५