पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. दिलासात सहा महिने राहिल्यावर आम्ही तिची नेमणूक स्वयंपाक विभागात केली. आमच्या मम्मी... गंगामावशी आता थकल्या होत्या, त्यांचा भारही हलका होणे आवश्यक होते. त्यातून शांतूला बालसदनातील मुलांचा लळा लागला होता. ती त्यांची काळजी घेऊ शकत होती.

 शांतूची विचार करण्याची ताकद विलक्षण होती. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तिच्याजवळ तयार असे. दिलासातील महिला एका मुलीची आई होती. मुलगी मामाजवळ होती. जांबुवंतीला शरीरातील भोग छळत. बाई माणूस आहे. तिलाही शरीर वासना... भावनांची ओढ असते. संस्थेत एक तरुण वॉचमेनचे काम करी. पहाटे पाच वाजता मम्मीला जागे करून तो झोपत असे. जांबू त्याची खोली झाडायचे निमित्त करुन तिथेच रेंगाळत राही. रात्रभर जागलेल्या त्याला तिचे रेंगाळागे, वेगळ्याच नजरेने पहाणे अस्वस्थ करी. शेवटी त्याने त्याची अडचण मला सांगितली. ही अडचण डॉ. लोहियांकडे -बाबूजींकडे सांगायचा संकोच वाटला. माझ्या मनासमोर नवाच प्रश्न उभा राहिला. शरीराच्या नैसर्गिक मागण्या संपन्नतेने पूर्ण करणाऱ्यांनी कोणत्या भाषेत त्यागाच्या नि उपवासाच्या प्रतिष्ठेच्या कहाण्या सांगायच्या? मी बेचैन होते. माझी व्यथा मी शांतूसमोर मांडली. शांतूचे धडक विधान. "आन त्यात काय काळजी हो ? अन् एवढं काय मनाला लावून घेता ? ज्याच्या त्याच्या कपाळाची पाटी वेगवेगळीच लिहिली जाते."

 ..तिने जांबूला समजावले ते असे. "जांबू ! यकांदा जिलबी खाल्ली काय नि रोज खाल्ली काय तिची चव येकच की। तुज्या नसीबात रोजची आठवन आली तर चव आठवावी नि समाधान मानावं. अगं तुला तरी पोटची लेकं आहे. तुजं आजचं आयुष्य शिक्षान नाही म्हणून नासंलं. लेकीला शिकीव. पायावर हुबी कर. त्यासाठी लई कस्ट करावे लागनार. अशी इंकडे तिकडे हुंगत बसलीस तर पोरीचं जीवन बी नासून जाईल. जरा शानी हो. दिलासात आलोय आपन. नामी संधी मिळाली. तिचा फायदा घे नायतर तुझ्या 'माझ्यासारख्या कितीतरी बायां ढोराच्या मौतीनं मरताहेत.... चल लाग कामाला.!"

 अशा या शांताने आपल्या मोठ्या बहिणीचे घर पूर्णपणे बदलून

आपले आभाळ पेलताना/४२