पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आईवडील संस्था शोधीत आले. मीराला परत घेऊन जाण्यासाठी. मीराला त्यांच्याबरोबर परत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिने काही गोष्टी मीठमसाला लावून सांगितल्या होत्या. आठ बहिणी नव्हत्या. होत्या सहाजणी. मोठीने आसामात देलरकाम करणाऱ्या बरोबर लग्न केले होते. मीराचा नंबर तिसरा. तिच्याहून मोठी मीना. तिचे लग्न गेल्यासाली झाले. मीराला नटायमुरडायची खूप हौस. ते आईला आवडत नसे. त्यात ती ज्या घरी कामाला जाई तिथे हातउचल करी. मुर्तुझा हा शिकणारा मुलगा नव्हता. तो कुठल्याशा फॅक्टरीत फिटरचे काम करत असे. तो नांदेडचा होता. दिसण्यात देखणा होता. त्याच्याशी मीराची असलेली जवळीक आईवडिलांना आवडत नसे. त्यातून मुसलमान मुलगा आपल्या पोरीला बिघडवतो याचा राग येई. दोघेही मीराला खूप मारत. पण तिच्यातला धट्टपणा कमी झाला नाही.

 मीरा पळून गेल्यावर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी केला नाही. बला टळली असेच वाटे. पण आठवण मात्र येत राही. शेवटी पोटची लेक. तिचा पत्ता लागल्याचे भावाकडून कळताच आईने उचल खाल्ली. लेकीला भेटावं असा हेका धरला.


 आणि ते संस्थेत आले. "ताई सख्खे आईबाप झाले म्हाणून काय झालं ? इतकं मारतात का पोरीला? कंदी तरी मायेनं पोटाशी घेतलंय का मला? विचारा ना! मला नका धाडू तिकडे". मीराने हट्ट धरला. मीरा आमच्याकडे १९८९ ते १९९१ या काळात होती. दरम्यान तिला आम्ही ४ थी परीक्षेस बसवले. त्या निमिताने वैद्यकीय शास्त्रानुसार तिचे वय निश्चित केले. ते सतरा एवढे भरले. मीरा आठरा वर्षाच्या आतली होती. तिने वडिलाकडे जाणे कायद्याच्या दृष्टीने योग्य होते. वडिलांनी यापुढे तिच्याशी नीट वागण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तिच्या इच्छेविरुद्ध तिची आईवडिलांबरोबर पाठवणी केली. नियमानुसार तिच्या सामानाची तपासणी झाली. त्यात तऱ्हेतऱ्हेची सेंटस, चेहरा साफ करायचे क्लीनसिंग लोशन, लॅक्मे....पाॅण्डस क्रीमच्या बाटल्या, आयब्रो पेन्सिली, चार रंगांच्या ओठ कांड्या (लिपस्टिक्स), गुलाबपाण्याची बाटली, चंदन पावडर असा भरपूर महागडा खजिना सापडला. तो पाहात असताना गेल्यावर्षीच्या माहेर संमेलनात तिने केलेले नृत्य मला आठवले. सुरेख साडी, माथ्यावर बिंदी, नाकात नथनी, कमरपट्टा यात सजलेली देखणी मीरा तबकडीच्या तालावर

आपले आभाळ पेलताला/३४