पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मरेस्तो मारने. आईने दोन दिवस उपाशी ठेवले. अर्थात मुलांचे कामही बंद करुन टाकले. घरची देखभाल मीरावर सोपवून आई खोकत खाकत चार घरची धुणीभांडी करू लागली. चार आठ दिवस बरे गेले. आई बाहेर कामाला गेली की धाकट्या भावंडांच्या हातावर चॉकलेट गोळ्या देऊन मीरा मुर्तुझाची खोली गाठे. तोही वाट पाही. खोलीतली बाकीची मुले गावी निघून गेली होती. हा मात्र मीराच्या ओढीने लातूरला राहिला होता. धाकट्या भावाने, बालाजीने एक दिवस आईजवळ कागाळी केली. त्या रात्री तर मीराला बापाने इतके बडवले की शेजारच्यांनी सोडवले. मुर्तुझाला त्याच्या मालकाने खोली मोकळी करायला लावली. बापाला वाटले की पोरगी आता तरी ठिकाणावर येईल. मुर्तुझाने शेजारच्या झोपडपट्टीत एका मित्राच्या मदतीने खोली केली. एक दिवस मीरा घरातून नाहिशी झाली. दोघांनी सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन एकमेकांना माळा घातल्या. भांगात सिंदूर, पायात बिछड्या, हातात चुडा, त्यात सवितादीदींनी दिलेली शंखाची बांगडी अशा थाटात मीरा संसाराला लागली. मुर्तुझाही मजुरी करी. दोन वेळचे भागे. जेमतेम महिना झाला असेल नसेल लग्न करुन. एक दिवस मुर्तुझा काम शोधायला गेला तो परतलाच नाही. आठ दिवस गेले. एक रात्री त्याचा मित्र आला. वेडंवाकडं बोलू लागला. त्याच्याजवळ मीराने राहाण्याची भाषा तर लागला. मीरा संतापली, आरडाओरडा करुन तिने चार माणसे गोळा केली. पण साऱ्यांनी तिलाच दोष दिला.

 "बगा ताई. समदे माझ्या तोंडावरच थुंकले. ही पोरगीच चवचाल आहे म्हणे. त्या भाडयाला कुणी दोष दिला नाही. मग दुसऱ्याच दिवशी ती झोपडी खाली केली. एस्टीस्टॅंड वर लई वेळ बसून ऱ्हाईले. कुठं जावं कळेना. मग नाइलाजानं आईच्या दारात गेले. तिनेपण शिव्या दिल्या. म्हणाली, बाप यायच्या अगूदर काळं कर, तू दिसली तर तुजा गळा कापील नि जाईल जेलात. त्यो जेलात गेला तर या पसाऱ्याच्या तोंडात काय कोंबू ? एवढी भाकर खा. पानी पी. हे पन्नास रुपये घे नि काळ कर. सावतर आईच. पण तेवढी दया केली बघा. मग पुना स्टॅंडवर आले. दिसल त्या गाडीत बसले नि इथे अंबाजोगाईत पोचले. रस्त्यावरुन हिंडताना एका ब्युटिपार्लरची पाटी दिसली. तिथं आत शिरले. सवितादीदीने मसाज करायला शिकविले होते. पंधरावीस दिवसांनी मीच दीदीचा चेहेरा साफ करुन द्यायची. म्हटलं ही नोकरी मिळाली तर बरंच हाय. पण नशीब खोट. त्या बाईच्या नवऱ्याची

आपले आभाळ पेलताना/३२