पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनाही लागली. त्यांनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केला. लिलीने मोकळेपणी सांगितले की ती आता कुणाच्याही घरी काम करणार नाही. तिला संस्थेतच राहायचे आहे, जिथून तिला कोणीही, कधीही काढू शकणार नाही, कुठेही कामाला पाठवले जाणार नाही अशा संस्थेत.

 आणि त्या ताईंनी अशा संस्थेचा शोध घेतला. कदचित केडगांवच्या रमाबाई महिला अनाथाश्रमात लिली स्थिरावलीही असेल.

 जन्मल्यापासूनचा खडतर प्रवास. तऱ्हेतऱ्हेच्या आडवाटांनी जाणारा. ऐन विशी-तिशीत शेवटच्या दिवसाची वाट पाहाणारी लिली. समाज, कुटुंब, धर्म न दिलेली, एकाकी भारतीय स्त्री. तिने मम्मीला.... आमच्या गंगामावशींना एकदा सवाल केला होता.

 मम्मी, मी रुखसानाबेगम की लक्ष्मी की लिली? तू नवव्या वर्षी विधवा झालीस नि म्हातारी होईस्तो लोकांच्या घरात न्हाईतर भावाच्या दारात धुणीभांडी उपशीत बसलीस. तू हिंदू घरात जनमालीस तर मी मुसलमानाच्या घरात. या जगानं.... आपल्या आईबापानं... या सूर्यानं.... या मातीनं.... काय दिलतंग आपल्याला ? झाडांनी सावली बरीक दिली. पण तीही क्षणभराची.. आता पुढच्या जन्माची वाट पाहात बसायचं. बस्स.... मम्मी हे असं का ? ... हे असं का?

आपने आभाळ पेलताना/२८