पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घरात कामाचा ताण. पोटभर अन्न मिळत नसे. तारुमावशी हाल हाल करी. तिला वाटे की लिलीने बाळ घेऊन घरातून निघून जावे. सत्येनला जातीतली चांगली मुलगी करून देण्याचा घाट तिच्या मनात शिजत होता.

 "पोरगं बिघडू लागलं. मग म्हटलं वेसवांकडे जाऊन जिंदगी खराब होण्यापेक्षा आईबाप नसलेल्या पोरीशी जुळवून दिलं. लग्न कसलं आलंय? उगा माळा घातल्या घरात. नि धाडून दिलं महाबळेश्वरला मजा मारायला. पोराची जात. बापाच्या वळणावर गेलीया. तो पण असाच होता. आन त्यातचं रोग लागून मेला. मला पन तरास झाला. तवा ही नवी युगत शोधली. रेणूच्या काकीनंबी साथ दिली. आता आपल्या जातीची... खानदानाची नवी दुल्हन आणू. भाईसा, तिकडं जयपुराकडेच बघा कोना अडल्यापडल्याची पोरगी. इथं काय कमी नाही. पैसा अडका भरपूर आहे ". तारूमावशी जयपूरहन आलेल्या तिच्या भावाला आपला बेत सांगत होती.

 "वर्षात लेकरू पन झालं. पण ते आहे डोक नसलेल, अशक्त केव्हापण मरेल नाही तर मलाच काय तरी करावं लागेल. दोगांचा काटा काढावाच लागल." हे सारं ऐकतांना लिलीच्या अंगावर काटा आला. हीच तारूमावसी लग्नाआधी हौशीनं नवी साडी नेसायला द्यायची. बाजारातून मिठाई, लस्सी, मिसळ आणून खाऊ घालायची. तीच आता अशी वागतेय? बाळाच्या मृत्यूच्या कल्पनेने लिली विलक्षण धास्तावली. आणि एका संध्याकाळी ती घराबाहेर पडली. घराबाहेर पडली खरी. समोर बारा ताटा मोकळ्या होत्या. पण एकाही वाटेवर घर नव्हतं.... डोक्यावरून हात .. फिरवील असं माणूस नव्हतं. एक वाट तिला दिसली. आणि ती थेट एस.टी.स्टॅंडच्या दिशेने चालू लागली. पण चढणार कोणत्या एस.टी बसमध्ये. बाळाला पदराखाली घेऊन तशीच बसून राहायची. पोटात अन्न नाही. जवळ एक पिशवी नि स्टीलचा ग्लास. दोन दिवस असेच गेले. एस.टी. स्टॅंड वरच्या लोकांच्या नजरेत हे मायलेकरू बिन रस्त्याचं आहे हे लक्षात आलं असावं. तिसऱ्या रात्री पोलिस आले आणि त्यांनी लिलीची रवानगी ठाण्याच्या महिला स्वीकारगृहात केली. अवघ्या चार दिवसांत ते मूल लिलीच्या मनाला धक्का देउन कायमचे दुरावले.

 तेव्हापासून लिलीचे ओठ जणू गच्च मिटून गेले. पण डोळ्यात एकाकी... असहाय चमक आली. तीन वर्षे त्या स्वीकारगृहाचे नियम पाळीत

आपले आभाळ पेलताना/२४