पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेगळाच. सत्येन दिवसातून जेमतेम दोन तास दुकानांवर थांबे, बाकी सारे तारुमावशीलाच बघावे लागे. हा सत्येन लिलीला पाहून विरघळला. इवलेसे ओठ. लांबट डोळे. लांबसडक केस. त्याने रेणूशी दोस्ती वाढवली. लिलीला घेउन रेणू दुकानात जाई. मग सत्येन तिथेच थांबे. सातवीची परीक्षा जवळ आलेली. लिलीच्या वागण्याला शालूमावशी कंटाळाली होती. पण करणार काय ? तिच्या अब्बांची दूर बदली झाली होती. गेल्या सहा-सात वर्षात त्यांनी कधी चौकशी केली नाही वा पत्राला उत्तर पाठवले नाही. फक्त निरोप आला होता की पोरीला सांभाळा. तिला आमची आठवण येऊ देऊ नका. वाटल्यास हिंदू करुन दत्तक घ्या. त्या निरोपाचा विचार करावासा वाटला नव्हता आणि एक दिवस लिली शाळेतूनं घरी आलीच नाही. खूप शोधाशोध केली. रेणूला पोलिसात नेण्याचे भय दाखवले तेव्हा तिने सारे सांगितले. तारूमावशीने सत्येनचे लिलीशी लग्न करून दिले होते. आणि दोघांना महाबळेश्वरला धाडले होते. लिली जेमतेम सोळाची होती. पोलिसात जावे तर नाते काय सांगणार ? तिच्या पालकांचाही ठावठिकाणा नाही. या विचाराने शालूमावशी नि तात्या गप्प बसले...

 अर्थात हे तपशील लिलीच्या फाईलमध्ये नव्हते. लिली बोलती व्हायला सहा महिने लागले. लिली अत्यन्त कमी बोलत असे. अगदी इवलेसे ओठ गच्च मिटलेले असत. आवाज तर इतका गोड आणि नाजूक की, ती काय बोलतेय हे कळायला पाच मिनिटे लागत. कपडे अत्यन्त स्वच्छ धुवी. तिला हातखर्चासाठी जे शंभर रुपये मिळत त्यातले साबणासाठीच पंचवीस तीस रुपये जात. परकर वा साडी कधी फाटलेली दिसणार नाही. ती वेळच्या वेळी नीट शिवली जाई. तिच्या भांडणाचा मुद्दा एकच. हिने माझा साबण पळवला वा तिने सर्फची पावडर चोरली. एक दिवस पेटीसाठी कुलूप आले. साबण कुलूपबंद असत. अगदी वाटोळा चेहरा. अपरे कपाळ. ओळीत बसलेले चिमुकले हात. बांधा मात्र काहीसा आडवा. एक दिवस तिने गंगामावशीना..... दिलासातील मम्मीला विनंती केली की मम्मीने तिला लक्ष्मी म्हणावे. मम्मीशी ती जरा मोकळे बोलत असे. सत्येनने तिचे नाव लक्ष्मी ठेवले होते. लग्नाचे पहिले वर्ष खूप छान गेले. लिलीला घरातली सारी कामे उत्तम येत. हाताला चव होती. सत्येन लाग्नानंतर घरात स्थिर झाला. दुकानाकडे पाहू लागला. अकराव्या महिन्यात लिलीने अपुऱ्या दिवसांच्या बाळाला जन्म दिला. त्या बाळाच्या मेंदूची वाढ योग्य रीतीने झालेली नव्हती. अशा बाळाचे कौतुक कोण करणार? आणि बाळाच्या आईची काळजी तरी कोण घेणार?

आपले आभाळ पेलताना/२३