पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हती. पण आईला मात्र वाटे की आपले आयुष्य रांधा वाढ उष्टी काढा करण्यात गेले. पोरगी शिकून शहाणी झाली तर घराला हातभार लावील. आणि वडिलांचा, नवऱ्याचा विरोध पत्करून रुखसाना बेगमची रवानगी मुंबईला ....म्हणजे घाटकोपरा झाली. ती आता लिली झाली होती. शालू मावशी नि तात्यांचे दोन खोल्यांचे घर. दोघेही नोकरीला जात. लिली मावशीला मदत करी. आठ वर्षांची लिली भाकरी..पोळ्या झकास करायची. त्याचे कौतुक चाळीतल्या साऱ्यांना वाटे. त्या चाळीसाठी ती लिली होती. शालू मावशीच्या मावसबहिणीची मुलगी. आई नसलेली सावत्र आईच्या त्रासाने जाचलेली. वगैरे....वगैरे. जूनमध्ये लिलीचे नांव शाळेत घातले. वर्गातील साऱ्या मुली सहा वर्षांच्या आतबाहेरत्या नि लिली मात्र नऊ वर्षाची. तिलाही ते कसेतरीच वाटे. सकाळी सातला शाळा भरे. पहाटे पाचला उठून मावशी आणि ती तिघांचे डबे तयार करीत. साडेसहाला लिली दप्तर उचलून घराबाहेर पडे. परत यायला साडे बारा वाजत. आल्यावर एकटीनेच जेवायचे. मग घर चित्रातल्यासारखे साफ करुन चक्क ठेवायचे. शिवास कधी हे निवडायचे असे तर कधी ते मिक्सरवर वाटून ठेवायचे असे. दोन खोल्यातल्या कामांना वेळ तो कितीसा लागणार ? तात्या बरोबर सहाला घरात पाऊल टाकत. पंधरा मिनिटात मावशीपण येई. मग चहा करण्याची जबाबदारी लिलीचीच. लिली चहा मोठा सुरेख करी. दिवाळी..दसरा..पंचमी सारे साण हसत खेळत येत. छान फ्रॉक....रंगीत रिबिनी. शिवाय अधूनमधून हॉटेलात जेवायला जायचे. दिवस पळत होते. पाहाता पाहाता लिली दुसऱ्या नंबराने पास होऊन चौथीत गेली. एक दिवस मधल्या सुटीत शिवाणापाणी खेळताना एक मैत्रीण लिलीकडे पाहून ई S S S करुन ओरडली. लिलीच्या झग्याला लाल डाग पडले होते. लिली घाबरुन घरी आली. घरात तरी कोण होते ? दोनदा चड्डी बदलली तरी ती खराबच होई. लिली दिवसभर रडत होती. संध्याकाळी तात्या आले. तेही बावरून गेले. बाहेरच चहा पिऊन येतो सांगून बाहेर पडले. शालू मावशी आली. तिने मात्र पाठीवरून हात फिरवून धीर दिला. आंघोळ घातली. सारे समजावून सांगितले. पण त्या दिवसापासून मावशी ति तात्यांची लिलीकडे बघण्याची दृष्टी बदलली. एरवी अभ्यासात मदत करणारे, डोक्यावरून हात फिरवणारे तात्या हरवून गेले. एरवी शालूमावशी, तात्या आणि लिलीवर घर सोपवून सुट्टीत मैत्रिणीकडे दिवसभर राहायला जाई. पण आता मात्र थोडावेळही तात्या आणि लिली दोघेच घरात नसत. लिलीला झग्यांऐवजी दोन मॅक्सी शिवून आणल्या होत्या. शरीरात होणारे बदल लिलीला जाणवत. खूप...खूप प्रश्न मनात गर्दी करुन उठत.

आपले आभाळ पेलताना /२१