पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थापकांचे अनैतिक संबंध आहेत त्यासाठी संस्थापकाची पत्नीच सहकार्य करते वगैरे प्रचार सुरु केला. काही पालकांनी मुलींना वसतिगृहातून काढून घरी बसवले. पार्वती मात्र तिथेच राहिली. तिच्या नवऱ्याला हाताशी धरुन, त्याला पैशांची लाच देऊन, त्याच्याकडून पोलिसांत तक्रार करविली की त्याची पत्नी पार्वती व संस्थाचालकाचे अनैतिक संबंध आहेत. कोर्टाने सावित्रीची रवानगी जिल्ह्याच्या महिला स्वीकारगृहात केली. या 'स्वीकारगृहाचे व्यवस्थापन करणाऱ्या ताईंना पार्वतीसारख्या सुजाण, अबोल, असहाय सुशिक्षित तरुणीने तेथे राहणे योग्य वाटे ना. कारण या स्वीकारगृहातील बहुतेक महिला मानसिकदृष्ट्या आजारीच होत्या. त्यांनी आमच्या संस्थेकडे एका महिला कार्यकतीद्वारे निरोप केला. पार्वतीची इच्छा आमच्या दिलासागृहात राहाण्याची असल्याचा अर्जही पाठवून दिला. आणि एक दिवस पार्वती त्या व्यवस्थापिकाताईंबरोबर संस्थेत दाखल झाली. परतताना व्यवस्थापिकांताईनी आणखीन एक अत्यन्त चांगली मुलगी त्या स्वीकारघरात गेल्या तीन वर्षांपासून सडते आहे, तिलाही दिलासागृहात प्रवेश द्यावा आणि तिच्या पायावर उभे करावे अशी विनंती केली. दिलासागृहात सहा महिला एकावेळी राहात. त्यावेळी दोन जागा रिकाम्या होत्या. आम्ही त्यांची विनंती मान्य केली. आणि दोन दिवसांनीच लिली आपले सामान आणि पूर्वेतिहासाच्या भल्यामोठ्या फाईलसह दिलासाघरात दाखल झाली.

 लिलीचे अब्बा रेल्वेखात्यात कामाला होते. कोल्हापूरजवळच्या एका गेटवर हिरवा-लाल झेंडा दाखवायची ड्यूटी होती. लिलीला नऊ बहिणी आणि दोन भाऊ. बारा मुलं नि आईबाप असे चौदा जणांचे घर. हातात येणारा पैसा पुरणार कसा? कोल्हापुरात त्यांच्या वडिलांनी बांधलेले पडके घर होते. त्यात चार भावांचा हक्क. लिलीच्या आब्बांच्या वाट्याला एक खोली, एक पडकी नि थोडी बखळ जागा आली होती. दोन्ही मुलगे शाळेत जात. मुली मात्र सकाळी मौलवीसाबांकडे थोड़े फार धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात असत. एखादवर्षानंतर तिथे जाणेही बंद होई. अवतीभवतीच्या घरात धुणीभांडी, केरवारे करून चार पैसे कमावण्यासाठी पोरीची पाठवणी होई. लिली एका सुसंस्कृत मराठी कुटुंबात काम करी. त्यांच्याकडे मुंबईहून पाहुणे आले होते. चुटचुटितपणे काम करणारी, गोंडस लिली त्यांना आवडली. त्यांच्या घरात मूलबाळ नव्हते. गृहिणीला हाताशी कोणीतरी हवेच होते. त्यांनी लिलीला मुंबईस नेण्याबद्दल तिच्या आईवडिलांना विचारले. तिला शाळेत घालण्याची, शिक्षण देण्याची हमी दिली. वडिलांना ही बात पसंत

आपले आभाळ पेलताना/२०