पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागेल या भीतीने तो पुण्याहा गुंड घेऊन येतो. आणि सुनंदाच्या घरासमोर जाऊन शिव्या-धमक्या देतो. पोलिसाकडे दाद मागितली तर ते लक्ष देत नाहीत. साधा अर्ज दाखल करण्यासाठी कुणाची तरी चिट्ठी लागते. सुनंदा मात्र धीराने उभी आहे. आई-वडिलांच्या सहाय्याने मुलाला वाढवते आहे. मात्र भेटली की एकदा तरी विचारते.

 'भाभी, माझा मुलगा तर तो नेणार नाही ना? तेवढा माझा मला राहू द्या. मग कशालाच डरत नाही मी. कोर्ट मुलाचा ताबा तर नवऱ्याला देणार नाही ना !' काय उत्तर देणार आपण? शेवटी पोलीस आणि न्यायाधीश या समाजाचेच घटक. समाजातील वकील असोत, खोट्या साक्षी देणारे निढविलेले साक्षीदार असोत, सामाजिक न्यायदानासाठी समतोल तराजू हातात घेणारे न्यायाधीश असोत किंवा कायदा करणारे तज्ज्ञ असोत ते या समाजाचे घटक असतात.

 समाजात स्त्री विषयी जी भूमिका रुजली आहे तीच त्यांनी घेतली तर कोणी कोणाला बोल लावायचा? समाज मनातील स्त्रीचे चित्र बदलायचे असेल तर तळापर्यंत पोचायला हवे.

 समाजातील मानसिकता बदलण्याचा प्रयोग म्हाणजेच मानवलोक वा मनस्विनीसारख्या सामाजिक संघटना वा संस्था. आज परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरावे यासाठी झगडणाऱ्यांची संख्या वाढतेय.

 या ठिकाणी एक गोष्ट आठवते. जी रामशास्त्री प्रभुण्यांच्या नावाने सांगितली जाते. एक लाल-लुगड्यातली विधवा उत्तम प्रवचन करीत असे. प्रवचन ऐकावयांस रामशास्त्री आलेले पाहून तिने प्रश्न केला. शास्त्रीजी, स्त्री आणि पुरुष निसर्गत: सारखेच. जन्म सारखा, मृत्यू सारखा. अनुभव घेण्याची शक्ती सारखीच. असे असतांना स्त्रिया व पुरुषांना दुहेरी न्याय का? पती मरण पावला तर बाईला विद्रुप केले जाते. अशुभ मानले जाते पण पुरुषाची पत्नी मरण पावली तर पंधराव्या दिवशी तो दुसरा विवाह करतो असे का? शास्त्रीजी उतरले, 'बाई तुमचे म्हाणणे खरे आहे. न्याय देणारे आणि न्यायासाठी कायदे करणारे पुरुषच. एक वेळ अशी येईल, त्यावेळी तुमच्यासारख्या स्त्रिया कायदे तयार करतील. न्यायदान देण्यासाठी आसनस्थ होतील तेव्हा स्त्रियांना जरुर न्याय मिळेल.


आपले आभाळ पेलताना/१७