पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्त्रीमुक्तीसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे संसार, कुटुंब नाकारणाऱ्या, मुक्त लैंगिक संबंधाची भलावणी करणाऱ्या बायका. अशी भूमिका स्वत:ला संस्कृतीरक्षक समजाणारे सोयिस्करपणे पसरवीत असतात. त्यांना काय माहीत की स्त्रीला घर हवे असते. मात्र ते शोषनमुक्त हते. जिथे स्त्रीला माणूस म्हणून सन्मान असतो, प्रगतीची संधी असते ते घर तिचेही असते.

 बाईचं 'माणूसपण' समाजाला मान्य करायला लावताना शेकडो कोस अनवाणी चालत जावे लागणार आहे. पण अनेकांचे....सुजाण स्त्री-पुरुषांचे हात जेवढे वाढतील तेवढे हे अंतर सोपे आणि जवळचे होणार आहे. भारतीय तत्वज्ञान 'आत्म्याचे अस्तित्व' मानते. मग आत्म्याला जात असते का? लिंग असते का? स्त्रीच्या सतत जाळणाऱ्या आत्म्याची कोणती सोय आम्ही लावली?

आत्मा चालला उपासी, दूरदूरच्या गावाले
माय मातीच्या कानांत, दोन सवाल पुशीले..
गांठ गांठ पदराला, वल्या वढाळ वळखी
माती मातीला मिळता, पुढं निघाली पालखी
पालखीत कोण राणा? त्याले काय रुप रंग?
कुन्या जातीचा पालव, आता डोईवर सांग...
कुकवाचं देन-घेणं, काळ्या मन्यांचा वायदा
परदेशी पराईण, तिले कोनाचा कायदा?
काया मातीची वाकळ, आता मागेच सुटली
आभाळाच्या अंतरातं, एक जखम गोंदली....


 रोज रोज मरणाऱ्या अशा कित्येक 'परदेशी पराईणी'. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताना लाखो जखमा उरात गोंदल्या जातात. निदान एकीला तरी मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून आपण साऱ्यांनी तिच्या या दोन प्रश्नांना उत्तर द्यायला बांधून घेतले पाहिजे.

 तर, अशा हजारों कहाण्यांपैकी या चार दोन. आपले आभाळ आपणच पेलण्याची उमेद त्यांच्यात निर्माण करण्याच्या एका अधुऱ्या प्रयत्नाचा... धडपडीचा. . . ध्यासाचा हा त्रोटक आढावा.


आपले आभाळ पेलताना/१८