पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आग्रह सोडले आहेत.

 "..... माझ्या मामाला इथल्या मोठ्या दवाखान्यात ठेवलं होतं. त्याच्या जवळ कोणीतरी हवं म्हणून मला हितं ठेवलं, माज्या बापानी. तेबी यायचे रोज संध्याकाळी. मी कपडे धुवाया जवळच्या तळ्यावर रोज जायची. तिथच ती बाई भेटली मला. म्हणाली, तू तराणीताठी पोर, इंथं कशाला धुणं धुतीस. माज्या घरी चल. तिथंच आंघूळ करीत जा नि कपडे बी धूत जा. बकूळ पानी, हाय. मला बरी वाटली बाई, बामणासारखं राहणं नि बोलणं. मग जायला लागले तिथे. जेवू बी लागले. कंदी कंदी मुक्काम पन करु लागले. बापाला सांगितलं की चांगली मावशी भेटलीय. लयी माया करायची माझ्यावर. तिनंच माझ्या केसांची सागरवेणी घालायला शिकवली. मॅक्सी शिवली. पंजाबी ड्रेस घेतला. एक दिवस मामाकडे गेलेच न्हाई.बाईजीकडेच राहिले. तिथे रात्री तरुण पोरं येत. मजा करत. व्हिडिओ बघत. चार पाच पोरी पन येत. एक दिवस मी बी एका पोरासंग खोलीत गेले. बाहेरून बायजीनं दार लावून घेतलं..." ती गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमधली नखरेल मुलगी बोलत होती. मी सुन्न होऊन ऐकत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी तिची त्या घरातून सुटका केली होती. काही कार्यवाही न्यायालयातून व्हायची असल्याने व इथे महिलांसाठी कस्टडी नसल्याने तिला दोन दिवस 'दिलासा'त ठेवले. पण त्या दोन दिवसात लक्षात आले की ती पंधराच्या उंबरठ्यावरची पोर गळ्यागत बुडली होती. वैद्यकीय तपासणीतून लक्षात आले की नको ते रोगही जडले असावेत. दोन दिवसात इथे खूप रमली. बापाचा पत्ता देऊन म्हणाली की, त्याना बोलवा. पहावसं वाटतंय. पोलीस नियमानुसार तिला औरंगाबादला घेऊन गेले. सुधारगृहात ठेवले. पण एक दिवस बाई दिलासात हजर. तिला आमच्याजवळ राहायचे होते. पण ती चार दिवसापेक्षा एक दिवसही इथे राहू शकली नाही. संध्याकाळ झाली की तिचे डोळे लकाकू लागत. टग्या पोरांच्या फेऱ्या आसपास वाढल्या. इथली शिस्त तिला मानवेना. शेवटी तिची रवानगी परत पोलिस स्टेशनमध्ये केली आणि मनाची एक खिडकी बंद करुन घेतली. नंतर चारच दिवसांनी तिचे वयस्क वडील काठी टेकीत संस्थेत आले. ही त्याची सर्वात धाकटी लेक. आई तान्हेपणीच वारली.अति लाडामुळे शाळेत गेली नाही. घरात भाऊ-भावजया. घरी काम नाही की अभ्यास नाही. वाढत्या वयात मायेची पाखर न मिळाल्याने ती बेफाम बनत गेली. मामाच्या आजारपणाच्या निमित्ताने शहरात आली, तिथून पळून गेली.

आपले आभाळ पेलताना/१३