पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धुण्याभांड्यापलिकडची नोकरी मिळेल असा विश्वास तिला वाटत नव्हतां. दिलासा घरात आल्यापासून जीवनाकडे पाहाण्याचा तिचा दृष्टिकोन बदलत गेला. ती होमगार्ड झाली. तिथे सर्वोत्कृष्ट रक्षिका म्हणून ख्याती झाली. कांताला कोर्टातून न्याय मिळाला. ही निर्मळ मनाची. मनमोकळी. परवाच कांताचे स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र आलेय. ती केवळ साक्षार नाही तर सुजाण डोळस झाली आहे. कांताच्या नावानं चार पैसे बँकेत आहेत. मध्यंतरी भेटायला आली तेव्हा कांताला मी सहज म्हटले . "कांता तरुण आहेस. लग्न करायचं काय ? द्यायची का जाहिरात? तिचे उत्तर असे.

 "भाभी, एका बुरकुल्यात शिजलं नाही ते दुसऱ्या बुरकुल्यात शिजेलच यांची कोन ग्यारंटी देणार? हाय ती वरी हाय. काय कमी हाय मला? पोटच्याची माय तर कुणीबी होईल पण दुसऱ्याच्या लेकराची माय होनबी महत्वाच असतंच की !! " या कांता कुंभारणीने जे शहाणपण शिकविले ते कोणता वेद शिकवील?

 अशा अनेक कांता, लता, भागिरथी, शांता, सत्यशीला, पंचफुला, मंगला, सुलताना, ग्रेस.... अनेकजणी.

 हातात सहा महिन्याची प्रीती नि एक जुनकट पर्स एवढच समान.

 " ताई मी ग्रॅज्युएट आहे. मला एम.ए. करायचं" एवढच बडबडणारी सुधा. एका मध्यमवर्गीय शिक्षित घरात जन्माला आलेली सुधा एका विज्ञान विषयाच्या प्राध्यापकाची पत्नी आहे. पाठोपाठ चार मुलींना जन्म दिला हाच तिचा दोष. सततची मारहाण. माहेरी होणारी कुचंबणा. यामुळे तिचे मन जणू बधिरले होते. प्राध्यापकाशी सततचा संपर्क साधल्यानंतर महोदय संस्थेत आले. गृहस्थ स्वभावाने गरीब. त्यांच्या काही तक्रारी होत्या. सुधा गबाळी राहाते, मुलींना स्वच्छ ठेवत नाही. जेवणात केस निघतात मुलीच्या

 अभ्यासात लक्ष देत नाही...वगैरे, वगैरे. पण दोघांच्याही तक्रारी फारशा भयानक नव्हत्या. मारहाण होत नव्हती. पण शिव्या दिल्या जात हेही दोघांनी कबूल केले. मुलीच्या भवितव्याचा विचार उभयतांनी केला. गेल्या नऊ वर्षांपासून सुधा संसार करते आहे. कदाचित ती खूप सुखात नसेलही. पण तिने आणि नवऱ्याने त्यांचे तडकलेले घर सांधण्यासाठी स्वत:चे काही

आपले आभाळ पेलताना/१२