पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कायदा सल्ला केंद्र उभे राहिले. या केंद्राला मात्र समाजाच्या प्रत्येक थरातून प्रतिसाद मिळाला. दाखल होणाऱ्या प्रत्येक केसचा आम्ही अभ्यास करत असू. केस कोर्टात दाखल करण्यापूर्वी आम्ही सासरच्यांची नवऱ्याची बाजू ऐकण्याच्या भूमिकेतून त्यांना पत्र पाठवायचे. ७० टक्के लोक प्रतिसाद देत. त्यांच्याशी बोलताना प्रकरणाचा उलगडा होई. शेवटी प्रश्न माणसाचेच. रूढी, परंपरा, धार्मिक रिवाज, संस्कार यांच्यात हरवलेले माणूसपण वर काढण्यात कधी यश येई. मग पुन्हा एकदा पती-पत्नीचे सूर जुळून येत. हे यश न आले, हा ग्रहाचा धूर हरवता आला नाही तर मग कोर्टात जाणे आलेच.

 या एकाकी महिलांना केवळ आधार व प्रशिक्षण देण्याइतकेच मानसिक बळ देण्यावर आम्ही भर दिला. तिच्यातील आत्मविश्वास वाढावा; एकट्या स्त्रीलाही जीवनातील सौंदर्य, आनंद अनुभवता येतो याची प्रचीती यावी यासाठी आम्ही विविध उपक्रम आखीत असू. पंचमीचे फेर, ईदमिलापचा महिला मेळा, नवरात्रातील टिपऱ्याचा फेर, उखाण्याच्या स्पर्धा, नवी गाणी, पथनाट्ये, सहली इ.तून बायका धीट होत. आपले एकटेपणाचे आधुरेपण विसरून आपण सगळ्याजणी एक आहोत, मैत्रिणी आहोत याची जाणीव त्यांना होई. पाहाता पाहाता कळंब, बीड, माजलगाव, सेलू, केज येथे मोफत कायदा सल्ला केंद्रे सुरु झाली. अर्थात त्या गावातील गट उत्साही असेल तर केंद्र चांगले चाले. एक केंद्र आम्ही बंद केले. आज पाच केंद्रे सुव्यवस्थितपणे सुरु आहेत.गेल्या नऊ वर्षात सुमारे पाच हजार प्रकरणे नोंदवली गेली. त्यातील अनेकजणी स्वत:चा छोटा व्यवसाय करीत आहेत. बालवाडी शिक्षिका, आरोग्यासेविका म्हणून काम करीत आहेत.

 अगदी पहिल्यांदा आलेली कन्या कांता भाज्याच्या बालग्रामची 'सदनमाता' म्हणून काम पाहाते. या संस्थेची स्थापना करण्यात तिची महत्त्वाची भूमिका असल्याने ती कार्यकारिणीची सदस्यां आहे. दिलासात आली तेव्हाचा अवतार आजही आठवतो.....धुळीने माखलेले नऊवारी बिनकाष्ट्याचे लुगडे. उभा आडवा ताठर बांधा, राकट बोलणे, अडुम धुडूम चालणे. "आन मंग? उगा हाय का ह्यो देह? माज्या नोवऱ्यानं पलंगाच्या गजाळीनं मारलं. पन म्या हूं की चूं केलं न्हाय. मार म्हाणलं, तुझा जीव शांत होइस्तो मार. माज्या सासूलाच कीव आली. तिनंच हितं भैणीकडं आणून घातलं. बाईच बाईचा जीव जाणणार...!!.." हे ती झोकात सांगत असे. कांता दिलासा घरात राहायला आली तेव्हा आपल्याला कोर्टातून न्याय मिळेल,

आपले आभाळ पेलताना/११