पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगामावशी ऊर्फ मम्मी बायकांचे माहेरपण करीत. पोरांच्या आजी होत. गेल्या अकरा वर्षात सुमारे २०० हून अधिक महिला दिलासात राहून गेल्या. बहुतेक महिला खेड्यातून येणाऱ्या. अनेकजणी चक्क निरक्षर असत. मग तिथेच त्यांच्यासाठी साक्षरता वर्ग सुरु केला. या महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी, त्यांचे शिक्षण व आवड लक्षात घेऊन प्रशिक्षण देणारा विभाग सुरु केला. त्यात अशिक्षित महिलांना सहजपणे करता येणारे उद्योग शिकविले जातं. घायपाताच्या तंतूच्या शोभिवंत आणि गरजेच्या वस्तू करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबादहून शिक्षिका बोलावली. शिवणकाम, आरशाचे पारंपारिक भरतकाम, पापड, मसाले इ.चे प्रशिक्षण दिले जाई. मी पुण्या-मुंबईकडे बैठका वा मेळाव्यांना गेले की, चर्चा ऐकू येई. अपारंपारीक उद्योग मुलींना शिकवायला हवेत. किती दिवस माणसांनी लोणच्यात बुडायचे, वगैरे. मनाला ते पटत असे. पण लहान गावात अपारंपारिक उद्योगांना विशेष वाव नसे. आम्हीही प्रयोग केले. सायकलचे पंक्चर काढणे, स्टोव्ह दुरुस्ती, इलेक्ट्रिक फिटिंग, विटेला वीट जोडणारे गवंडीकाम इ. व्यवसाय शिकण्याची मोहीम सुरू केली. कारण आमच्या डोक्यात "बाया माणसाची कामे व गडी माणसाची कामे" यांचे विभाजन फिट्ट बसलेले. मग आम्ही एक जोड दिला, तो असा की, शिवण्याच्या कामात स्टोव्ह दुरुस्ती, पंक्चर काढणे, इलेक्ट्रिक फिटिंग यांचा समावेश केला. मुली हे नवे व्यवसाय उत्साहाने शिकत. स्टोव्ह दुरुस्ती, खडू तयार करणे याचा त्यांना पुढे उपयोग झाला. पण सायकल नि इलेक्ट्रिसिटी यांचे नाते महिलांशी असू शकते याला मान्यता मिळाली नाही. आमची खेडी एखाद्या उठावदार शहराजवळ असती तर कदाचित एखाद्या टी.व्ही. वा रेडिओच्या कारखान्यातील जुळणीची कामे बायका करु शकल्या असत्या.

 दिलासा घरातील महिलांना सन्मानाने घरी परत जाता यावे, ते शक्य नसल्यास पोटगी व संपत्तीत अधिकार मिळावा या हेतूने मोफत कायदा व कुटुंब सल्ला दिला जाई. दोन वर्षाच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, अशा तऱ्हेची मदत समाजातील अनेकजणींना हवी असते. कोर्टाची व वकिलाची फी देण्याची ऐपत घरातून हाकलून दिलेल्या बाईला कशी असणार? खेड्यापाड्यातून हिंडताना, बापभावाच्या घरात दिल्या अन्नावर जगण्याऱ्या परित्यक्ता भेटत. दिलासा घरात राहायला येणे त्यांच्यां बापभावांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असे. ती हिंमत त्या कशी करणार? उलट त्यांचे जगणे अधिक दुःखमय. या अनुभवातून १९८६ च्या जुलैत मोफत

आपले आभाळ पेलताना/१०