पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

कोणत्याही प्राण्याची अमर्याद वाढ होऊं देतां नये आतां एवढेच कारण असते तरी या निरूपद्रवी प्राण्यांना स्वसंरक्षणार्थ मारावे लागलेच असते,परंतु त्यांचा आहाराकडें उपयोग झाल्यामुळे त्यांना मारण्यात दुहेरी काम होते इतकेच,तेव्हा शास्त्रीयदृष्ट्या मांसाहार चांगला ठरल्यास केवळ भूतदयेच्या दृष्टीने तो न करणें म्हणजे मनुष्यजातीच्या दृष्टीने आपले कर्तव्य विसरणें होय. इतकेच लक्षांत ठेवले म्हणजे आहाराचा शास्त्रीय विचार करण्यास वाट मोकळी झाली आणि त्याकरितां प्रथम अन्नाचा शरीराला कसकसा उपयोग होतो हे पाहणें जरूर आहे.
 शरीराच्या काही क्रिया आपल्याला नकळत एकसारख्या किंवा वेळोवेळी चालू असतात, उदाहरणार्थ हृदयाची हालचाल, श्वासोच्छवास , अन्नाचे पचन, मलमूत्रोत्सर्ग वगैरे; आणि कांही आपण आपल्या इच्छेने करतो,उदाहरणार्थ चालणे,जेवणे, खेळणे, उडया मारणे, वाचणे, वगैरे; आणि साहजिकप या क्रियांमुळे शरीर थोडेंबहुत झिजते. तेव्हा ही झीज भरून काढून डागडुजी करणे हे अन्नाचे पहिले काम. शिवाय वाढीच्या वयांत वाढीला लागणारे साहित्य पुरवणे हेंहि याबरोबरच धरले पाहिजे, कारण हाही शरीराच्या घटनेचाच प्रश्न असतो.
 याशिवाय शरीराच्या सर्वं क्रिया होण्याला जी शक्ति दररोज खर्च होते, तीही दररोजच्या अन्नातूनच आली पाहिजे. ही शक्ति उत्पन्न होण्याकरतां अन्नाचे शरीरात ज्वलन होते. ‘ जठराग्नी ’ या शब्दांत हाच अर्थ आहे, आणि त्यामुळे उष्णता उत्पन्न होऊन शरीरही जरूर तितके गरम राहते. हे दोन अन्नाचे मुख्य उपयोग, पण ही दोन कामें योग्य रीतीने झाली म्हणजे शरीरात ताकत राहते, उत्साह येतो, एकंदर शरीर कार्यक्षम होते, आणि याचाच एक परिणाम म्हणजे कामवासना जागृत राहते, आणि सुप्रनाजननास मदत होते.
 ही कामें कशी होतात ते मागील प्रकरणात जी पांच प्रकारचीं द्रव्यें आपल्या शरीरासअन्नातून मिळावी लागतात असे सांगितले, ती योग्य प्रमाणांत असल्यास ही कामें आपोआप होतात. तेव्हा आतां या द्रव्यांचा आणि त्यांच्या प्रमाणांचा सविस्तर विचार करू.

----------
२६