पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुष्याचा आहार

मांसाहारी, शाकाहारी वगैरे भाग करणें फोल आहे, कारण केवळ शाकाहारी किंवा केवळ मांसाहारी प्राणि क्वचितच सांपडतील. कोणीकडून तरी आपल्याला मानवेल असे अन्न पोटांत घालणे म्हणजेच योग्य आहार. त्यांत कांही कमी पडल्यास न्यूनतेचे रोग होतील, किंवा एखादा भलताच पदार्थ पोटांत तो बाधेल. नैसर्गिक स्थितींत असें फारच क्वचित घडतें, कारण उत्क्रांतितत्वाप्रमाणे जो आहार ठरलेला असतो तो बाधक असणें शक्य नाही, आणि त्या पलीकडे इतर प्राण्यांना कांहीही खाणें सामान्यतः शक्य नसते. मनुष्याचा आहार अमुकच असावा हे तात्विक दृष्ट्या विचार करून ठरवणें कठिण, कारण इतर प्राणि पाहि- ल्यास त्यांपैकीं कांही फक्त फळे खातात आणि कांही मांस खातात, आणि दोन्ही प्रकारचे प्राणि जगतात इतकेंच नव्हे तर त्यांचे सर्व व्यापार सुरळीत चालून प्रकृति उत्तम राहते. तेव्हा सर्व जीवनव्यापार उत्तम रीतीने चालणें हा अन्नाचा उपयोग प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत एकच असला तरी त्यावरून अन्नाच्या प्रमाणाचा किंवा प्रकाराचा बिलकुल अंदाज बांधतां येत नाही, आणि अमुक प्राण्याचें योग्य अन्न काय हे नेहमी अवलोकनानेच ठरवावें लागतें, प्रत्येक प्राण्याच्या पोटांतली रासायनिक शक्ति वेगवेगळ्या प्रकारची असते, यामुळे वेगवेगळ्या प्रकारचें अन्न खाऊनही त्याचा परिणाम एकच होऊं शकतो.
 कोणत्याही प्राण्याचें योग्य अन्न अवलोकनाने ठरवणे सोपें नाहीं, आणि मनुष्याचे बाबतीत तर तें अत्यंत कठिण आहे. मनुष्याच्या खालचा 'शिंँपँझी' हा प्राणि घेतला तर हें अवलोकन त्यापेक्षा सोपें होईल, परंतु तरी देखील त्यांत किती गोष्टी येतात पहा. समजा या जातीच्या एका प्राण्याला दररोज उत्तम पिकलेलीं ३० केळीं लागतात. इतकीं केळीं मिळाल्यास आणि उष्णतेचे मान सुमारें सावलीत ९५ अंश असल्यास त्याला तें मानवेल. पण समजा उष्णता १२० अंश झाली, तर योग्य अन्न मिळूनही तो आजारी पडेल. किंवा उष्णता ७० अंशापर्यंत उतरल्यासही त्याला तें मानवणार नाहीं. तिसांपेक्षा कमी केळीं मिळाली तरी प्रकृति नीट राहणार नाही, आणि सहज कसे काय लागते म्हणून एखादें भलतेच फळ खाल्ल्यास कदाचित् त्याला विषबाधाही होईल इतकेंच नव्हे तर अन्न

११

,