पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

ठरेल, आणि अशा अन्नांत जरूर ते रासायनिक पदार्थ असते तर कदाचित् तसेंही झालें असतें. परंतु जरूर ते पदार्थ त्यांत नसतात आणि म्हणूनच मनुष्याला आपल्या अन्नाचें पृथक्करण करून त्यांत कोणते पदार्थ असणे इष्ट आहे हें पहावें लागतें. मनुष्याची अवनति झालेली आहे हें पुष्कळांस खरें वाटत नाही, परंतु तें सिद्ध करण्यास एवढी एकच गोष्ट पुरे आहे की इतर कोणत्याही प्राण्याला अन्न पचवण्याकरतां किंवा शरीराची सुस्थिति राखण्याकरतां कृत्रिम व्यायाम करावा लागत नाही, जरूर तो व्यायाम त्यांना आपोआपच होतो. याचें कारण असें की योग्य अन्नामुळे त्यांच्या अंगांत इतका उत्साह उप्तन्न होतो, की त्यांना स्वस्थ बसवतच नाही. बहुतेक सर्व मनुष्येतर प्राणि जरूर नसतांनाही नाचतांबागडतांना दिसतात आणि मनुष्याला सर्वांत जवळचा प्राणि म्हणजे बिनशेपटीचे वानर हे तर मनुष्यासारखे सुस्त कधीच दिसत नाहींत. त्यांची एकसारखी कांहीतरी हालचाल चाललेली असते. असे असतां मनुष्यालाच व्यायामशाळा कां काढाव्या लागतात ? आणि तेथे जाण्याचा आग्रह कां करावा लागतो ? आपोआप उड्या मारण्याची प्रवृत्ति लहान मुलांत मात्र दिसते, कारण कृत्रिम अन्नाने नुकसान होण्यास त्यांस पुरेसा वेळ मिळालेला नसतो. पण ही प्रवृत्ति पुढे कमी होत जाते आणि मोठेपणीं फारच थोड्या माणसांचें शरीर लवचीक असतें. वस्तुतः व्यायाम- शाळेतील व्यायाम म्हणजे नैसर्गिक नाचण्याबागडण्यापुढे अत्यंत हास्यास्पद वाटतो. इतर प्राणि व्यायाम करीत नाहीत, त्यांना आपोआप व्यायाम होतो, आणि त्यांना स्वस्थ बसायला लावले तर त्यांची प्रकृति बिघडते. यावरून मनुष्याची स्थिति किती हीन झालेली आहे हे लक्षांत येईल. तेव्हा मनुष्याचा योग्य आहार काय असावा हें समजल्यास, इतर प्राण्यांच्या अनुभवावरून पाहतां, म्हातारपणीं तरुण होण्याकरतां मनुष्यास कायकल्पासारखे उपाय करावे लागणार नाहीत असे म्हणण्यास हरकत दिसत नाही.
 कोणत्याही प्राण्याचा नैसर्गिक आहार काय, हें समजण्यास एकच मार्ग उपलब्ध आहे. तो म्हणजे त्या प्राण्याचें नैसर्गिक स्थितींत निरीक्षण करून, तो उपजत प्रेरणेने काय खातो हे पाहून, अशा पदार्थांची यादी करायची. प्राण्यांचे

१०