पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

अमुक वेळी खाल्ले तरच मानवतें असेंही असूं शकेल. उदाहरणार्थ घोडा विशेषतः रात्रीं खातो, आणि सकाळीं दिलेल्या अन्नापासून त्याला विशेष फायदा होत नाही. यांत कदाचित् हवेच्या उष्णमानाचाही संबंध असेल. या सर्व गोष्टी लक्षांत ठेवून अवलोकन केले पाहिजे, पण मनुष्य नैसर्गिक स्थितींत सांपडणेंच जर अशक्य झाले आहे, तर वरील प्रकारचें अवलोकन कसे शक्य होईल ?
 पुढील विवेचन समजण्यास सोपें जावें म्हणून येथें निसर्गासंबंधीं दोन शब्द सांगणें जरूर आहे. निसर्ग हा शब्द लोक अनेक अर्थानी वापरतात. या पुस्तकांत निसर्ग म्हणजे सर्व सृष्टि असा अर्थ घेतलेला नाही, कारण त्यांत मनुष्याचाही समावेश होईल. येथे निसर्ग म्हणजे मनुष्याने ज्यांत ढवळाढवळ केलेली नाही अशी सर्व सृष्टि. अर्थात् निसर्गाचे नियम मनुष्यालाही लागू असतात, आणि येथे हेही लक्षांत ठेवले पाहिजे की निसर्गाचा नियम 'अमुक कर, किंवा करूं नको,'असा कधीही नसतो. अमुक झाल्यास त्याचा परिणाम अमुक होईल, अशा स्वरूपाचे ते नियम असतात आणि आपणांस इष्ट परिणाम घडवून आणण्याकरतां निसर्गनियमांचा फायदा घेतां येतो. निसर्गाचे नियम मोडूं नये असे कोणी म्हटले तर त्याचा कांही अर्थच होत नाही, कारण निसर्गाचे नियम मोडणें अशक्य असतें आतां मनुष्याने ज्यांत बिलकुल फरक केला नाही असें कांहीही पृथ्वीतलावर सांपडणें कठिणच आहे, कारण मनुष्याने गिरण्यांचा आणि विड्यांचा धूर सोडून हवा खराब केली, सर्व प्रकारची घाण टाकून नद्या व समुद्र यांतलें पाणी खराब केलें, अरण्यें तोडली आणि त्या ठिकाणीं कुरणे किंवा शेतें केलीं; कित्येक प्राणि नामशेष केले आणि दुसरे कांही प्राणि आपल्या कामाला जुंपले. हल्ली जे जीवशास्त्राचे प्रयोग म्हणून करतात, ते या असल्या अनैसर्गिक स्थितीत ठेवलेल्या प्राण्यांवर. या सर्व प्रकारांमुळे निसर्गात स्वेच्छेने राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा मनुष्याची स्थिति इतर कोणत्याही दृष्टीने सुधारली असली, तरी प्रकृतीच्या बाबतींत मात्र सुधारली नाही, यांत तिळमात्र शंका नाही. इतर प्राण्यांना देखील ज्या नैसर्गिक प्रेरणा असतात, त्या त्यांना फक्त नैसर्गिक परिस्थितींतच उपयोगी पडतात. संवयीची

१२