पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुष्याचा आहार

प्राण्यांच्या आकारांत कितीही फारक पडला तरी त्यांत कांही महत्त्वाच्या गोष्टी कायम राहतात, किंवा निदान इतक्या सावकाश बदलतात की ती एकाच प्राण्याची उत्क्रांति आहे असे आपण म्हणतों. या उत्क्रांतीला हजारों पिढ्या लागतात आणि त्या अवधीत इतर परिस्थितींतही फरक होणें अपरिहार्य आहे. तथापि शरीराची वाढ व स्थिति बऱ्याच अंशीं अन्नावरच अवलंबून असल्यामुळे आणि विशेषतः प्रजोत्पत्ति ही शरीराच्या कांही विशिष्ट भागांच्या परिस्थितीवर अवलंबल्यामुळे, उत्क्रांतीमधें अन्नाला किती महत्त्व आहे हे लक्षांत येईल. प्राण्यांतील बहुतेक फरक अन्नामुळेच झालेले आहेत हे उघड आहे. मनुष्याच्या रक्तांत लोह असल्यामुळे तें तांबडे दिसतें आणि समुद्रांतल्या कांही प्राण्यांच्या अंगांत तांबें असल्यामुळे त्यांचें रक्त निळे दिसतें, परंतु हें तांबे किंवा लोह हीं अन्नांतूनच शरीरास मिळतात.
 वेगवेगळ्या प्राण्यांत असे फरक होत गेल्यामुळे आतां एकाचें अन्न दुसऱ्याला मारक होऊं शकते यांत आश्चर्य नाही. ज्या प्राण्याचें जें विशिष्ट अन्न उत्क्रांतीच्या प्रवाहाने ठरत आले असेल, त्यांत कांही कमी झाले तर त्याची अवनति होईल, व कदाचित् एखादा नवीन पदार्थ मिळू लागल्यामुळे त्याची उन्नतिही होणे शक्य आहे. परंतु आपल्या अन्नांत जीवनतत्वें ( व्हिटॅमीन्) पुरेशींआहेत की नाहीत, याचा विचार मनुष्याशिवाय इतर कोणत्याही प्राण्याला करतां आला नाहीं व करावा लागलाही नाही. ज्यांना योग्य अन्न मिळाले नाही ते मेले, आणि मिळाले ते जगले आणि उत्क्रांत झाले, आणि अशा हजारों पिढ्यांच्या उत्क्रांतीने त्यांचे अन्न कोणत्या प्रकारचें असावें हें ठरलेले आहे. इतर कोणत्याही प्राण्याला विस्तवाच्या साह्याने किंवा इतर मार्गांनी कृत्रिम अन्न तयार करण्याची युक्ति सांपडली नव्हती, पण मनुष्याने आज हजारों पिढ्या कृत्रिम अन्न खाल्ले आहे आणि त्यामुळे त्याची अवनति झालेली स्पष्ट दिसते. आणि याचे कारण हेंच की या कृत्रिमतेमुळे शरीराच्या गरजा आपोआप भागत नाहीशा झाल्या. कोणी कदाचित् असें म्हणेल कीं मनुष्य अशा अन्नावर हजारों पिढ्या जगल्यामुळे त्याची उत्क्रांति अशा रीतीने व्हायला पाहिजे होती की असें अन्नच त्याचें योग्य अन्न