पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

यांचें प्रमाण मनुष्याइतकें कोणत्याही नैसर्गिक परिस्थितीत राहणाऱ्या प्राण्यांत दिसत नाहीं, याचें मुख्य कारण मनुष्याचें कृत्रिम अन्न होय. या गोष्टीचा कोणी विचार करील तर ती सहज समजण्यासारखी आहे. जंगलांत नैसर्गिक स्थितींत राहणारे प्राणि एका बाजूला, आणि मनुष्य आणि मनुष्याने बाळगलेले, आणि त्याच्याप्रमाणें कृत्रिम अन्न खाणारे प्राणि दुसऱ्या बाजुला, असे प्राणिसृष्टीचे दोन भाग करून त्यांची तुलना केल्यास, निरोगी जीवनाच्या दृष्टीने जंगलांतील प्राणि कितीतरी श्रेष्ट आहेत हें कोणासही कबूल करावें लागेल. मनुष्य कपडे वापरून आपल्या त्वचेच्या कार्याला अडथळा करतो हेंही त्याचे एक कारण आहे, परंतु त्याचा विचार येथे करता येत नाहीं. येथे फक्त मनुष्याच्या आहाराचाच विचार करणें आहे, आणि त्याकरतां वेगवेगळ्या प्राण्यांचा नैसर्गिक आहार कसा ठरतो हे पाहणें जरूर आहे.
 आपल्या शरीरास न मानवणारा एखादा पदार्थ एखाद्या प्राण्याने खाल्ला तर तो मरेल, किंवा निदान त्याची प्रकृति बिघडेल, आणि तो परिस्थितींशी टक्कर देऊं शकणार नाही. असे प्राणि नैसर्गिक जीवनकलहांत टिकत नाहीत आणि मानवणारें अन्न खाण्याकडे ज्यांची प्रवृत्ति आहे असेच प्राणि टिकतात, यामुळें ज्या प्राण्याच्या बऱ्याच पिढ्या नैसर्गिक परिस्थितीत गेल्या, त्याची नैसर्गिक प्रवृत्ति मानवणारें अन्न खाण्याकडेच असते. प्रत्येक प्राण्याच्या प्रकृतीचा पाया रासायनिक असतो आणि या पायाला जे पदार्थ पोषक असतील, असेच पदार्थ त्याचे अन्न होऊं शकतात. हें ज्याचें जमणार नाही, तो प्राणि आपोआप नाहीसा होतो. तेव्हा जे प्राणि निसर्गात दिसतात, त्यांचा असा आपोआपच जम बसलेला असतो. प्रत्येक प्राण्याचें रासायनिक कोष्टक वेगवेगळे असल्यामुळेच त्याचा आहारही इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असतो. आहारामुळे प्राण्यांच्या आकारांत देखील फरक पडतो. ज्या परिस्थितीमुळे प्राण्यांची उत्क्रांति होते, त्या परिस्थितीचा एक महत्त्वाचा भाग अन्न हा आहे, आणि ज्याप्रमाणे बालपणापासून म्हातारपणापर्यंत बाह्य आकारांत अत्यंत फरक होत असूनही मनुष्याचें व्यक्तित्व कायम राहिले असे आपण म्हणतों, म्हणजे जन्मापसून मरेपर्यंत तो एकच मनुष्य मानतों, त्याचप्रमाणें उत्क्रांतीमुळे