पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुष्याचा आहार
-----०-----

 हवा, पाणी, उजेड या गोष्टींचें जीवनांतील महत्त्वाचें स्थान कोणीही कबूल करील, परंतु आहाराला मात्र लोक पुरेसें महत्त्व देत नाहीत, आणि तें सामान्य लोक देत नाहीत इतकेंच नाही, तर डाक्तरही देत नाहीत. डाक्तराच्या औषधाला पथ्य नसतें आणि वैद्याच्या असतें, हा पुष्कळ लोकांचे मतें डाक्तराचें औषध घेण्यांत मोठा फायदा असतो. शास्त्रीय दृष्टीने जुन्या वैद्यकापेक्षा डाक्तरी ज्ञान निःसंशय पुढे गेलेलें आहे, परंतु त्यांत हें एक वैगुण्य आहे यांत शंका नाही. सामान्यतः डाक्तराकडून औषध आणतांना त्याला कोणीं विचारलें की आहारांत कांही फरक केला पाहिजे की काय, तर तो म्हणतो ' छे, छे ! कांही करायला नको.' याचें कारण हें की या विषयाचा अभ्यास बहुतेक डाक्तरांनी केलेला नसतो. अलीकडे यूरोपांत याचा विचार होऊं लागला आहे व तिकडे पाकशास्त्रावरील पुस्तकांत व दररोजच्या स्वयंपाकांत देखील त्याचा परिणाम झालेला दिसतो. परंतु हिंदुस्थानांत अजून हें शास्त्र फारशा लोकांना माहीतच झालेले नाही, व तें सामान्य स्त्रियांपर्यंत मुळीच पोचलेलें नाही. यामुळे यावर पुस्तके वाचणारांना देखील घरीं बायका वाढतील तेंच खावें लागतें. जिभेचे शक्य तितके चोचले करायला मात्र सुगरण म्हणवणाऱ्या बायका शिकतात, पण त्याचा शरीराला उपयोग किती हें कोणी पहात नाही. मनुष्य पन्नास वर्षांत जे कित्येक खंडी अन्न पोटांत घालतो, तें जर त्याच्या शरीराला उपयोगी नसले तर त्या वयाला किंवा त्याच्या पुष्कळ आधी देखील तो कुचकामाचा होतो यांत नवल काय ? कोणी फाजील लठ्ठ होतो, कोणी हाडकुळा होतो, कोणाला मलावरोध होतो, कोणाला संधिवात होतो, किंवा आणखीही अनेक प्रकार होतात. कुरूपता आणि नपुंसकत्व