पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

स्वतःच्या आवडीनें निवड करून खाल्लेले अन्न वरील मुलांना मानवलें, यावरून कोणाला असें वाटेल की आपण सामान्यतः आपणास आवडेल तेंच खातों, तरमग कधीकधी आपल्याला खाल्लेले अन्न मानवत नाही असें कां ? याचें एक कारण असें की वरील प्रकारचे साधे पदार्थ आपण क्वचितच खातों. आपल्या जेवणां- तील बहुतेक पदार्थ मिश्र असतात, आणि या मिश्रणांत जरी एखादा पदार्थ न मानवणारा असला तरी तो बाधेल, शिवाय आवडीचे पदार्थ न मिळाल्यामुळे व कधीकधी दुसऱ्याच्या आग्रहामुळेही आपण न आवडणारे पदार्थ खातों. असे पदार्थ न मानवणें साहजिक आहे. शिवाय वरील मुलांपुढे ठेवलेले कांही पदार्थ जरी शिजवलेले असत, तरी यापेक्षा जास्त संस्कार कोणत्याही पदार्थावर झालेला नसे. म्हणजे त्यांत तळलेले पदार्थ, किंवा लोणी, तूप, साखर वगैरे कृत्रिम पदार्थ बिलकुल नव्हते. सर्वच अनैसर्गिक गोष्टी वाईट असतात असे नाही, परंतु अन्नाचे बाबतींत त्या आपणास न मानवण्याचा बराच संभव असतो, कारण अनैसर्गिक परिस्थितींत नैसर्गिक उपजत प्रेरणा काम करीत नाही किंवा चुकीच्या मार्गाला नेते, आणि म्हणूनच आहारशास्त्राची गरज भासते. आहारासंबंधी बहुजनसमाजांत इतक्या विलक्षण कल्पना फैलावलेल्या दिसतात, की या विषयाचा शास्त्रीय विचार अगदी अलीकडे होऊं लागला आहे हे त्यावरून स्पष्ट दिसतें. पहिले आठ नऊ महिने जरी मुलाला अंगावर पाजणेंच श्रेयस्कर असले, तरी दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचें दूध मनुष्याचें नैसर्गिक अन्न नव्हे, हेंही पुष्कळांच्या लक्षांत येत नाही. आहाराच्या विचारांत धार्मिक कल्पनाही विनाकारण घुसलेल्या आहेत आणि गोमांस खाणाऱ्या वेदकालीन आर्याचे वंशज आज जैन मताच्या आहारी गेल्यामुळे मांसाहाराविरुद्ध निष्कारण बोंबाबोंब करीत आहेत. शास्त्रीय सत्य काय आहे हे कळल्यानंतर ज्यांना धर्मा- मुळे त्याविरुद्ध वागावेंसें वाटेल त्यांची गोष्ट वेगळी. पण समंजस लोकांना शास्त्रीय सत्याचा खात्रीने उपयोग होईल आणि अशा लोकांकरतांच पुढील विवेचन आहे.

---------------