पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिमा सप्रे, गोविंद गोडबोले, रियाज शेख, रागिणी वाळके, शरणकुमार लिंबाळे, शैला व दत्ता सरदेशमुख, वामन काळे, श्रीपाद कहाळेकर, सुजाता कहाळेकर, बेनीमाधव बोरकार, श्रीमती मृदुला देसाई, श्रीमती सुनीता पटवर्धन, श्रीमती रुस्तम गोखले, जयंत एरंडे असे कितीतरी अधिकारी आले, गेले पण स्नेह, सद्भाव, प्रेम यातून लक्षात आले की आकाशवाणीची म्हणून एक संस्कृती आहे. शिष्टाचार आहे. चेक घेताना रेव्हेन्यू तिकिट लागायचे. जवळ नसायचं. कोणीतरी खिशातून, पाकिटातून काढून द्यायचा. पैसे देताना निघून घ्यायचं टाळायचे. ‘अतिथी देवो भव' ब्रीद न घेताही ही मंडळी ध्वनिमुद्रणाआधी किंवा नंतर (ते स्टुडिओ रिकामा असण्या/नसण्यावर अवलंबून असायचे!) चहा पाजायचीच. हा इथला बहुधा अलिखित नियम होता. (निदान माझ्यापुरता तरी!)
 या भाषणांनी मला भरपूर दिले. अभ्यास, वाचन, भाषण, लेखन, रचना, उच्चारण, वाचन गती, ध्वनिक्षेपकावर बोलणे, चढउतार, पानांचे अलगद बदल; सारे कौशल्य रेडिओनं दिल्यानं मी चांगला वक्ता होऊ शकलो. माझ्या लेखी आकाशवाणी केंद्रे ही 'वक्ता दशसहस्त्रेषु' घडविणाच्या दुर्मीळ पाठशाळाच होत. मराठी साहित्यिक रेडिओवर आला नाही, गायक रेडिओवर गायला नाही तर त्याला लोकमान्यता, राजमान्यता लाभत नाही हे आकाशवाणी केंद्रांनी वर्षानुवर्षे जपल्या जोपासलेल्या संचिताचेच फलित व प्रमाणपत्र होय.
 ‘आकाश संवाद' या माझ्या आकाशवाणीवरील भाषण संग्रहात प्रक्षेपित भाषणांपैकी निवडक २१ भाषणांचा अंतर्भाव आहे. यात चिंतनीय व दीर्घभाषणे आहेत. काही हिंदी भाषणांची मराठी भाषांतरेही आहेत. हा भाषण संग्रह विषय वैविध्याने नटलेला आहे. समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले, महाराष्ट्र माउली साने गुरुजी, क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे, महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी चक्रधर, संत कबीर यांच्या जीवन, कार्य व विचारांची माहिती यातून तुम्हास मिळेल. आपल्या समाजात अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वृद्ध यांचे अनेक प्रश्न समस्या आहेत. अनाथ मुले, मुली व महिलांच्या संगोपन व पुनर्वसन क्षेत्रात मी दोन दशके सक्रिय होतो. त्या काळातील प्रश्नांचे स्वरूप, ते सोडविण्याचे उपाय या अंगाने या भाषणातून सर्वांगीण विचार झाला आहे. हिंदी व मराठी या दोन्ही भाषा संस्कृत भाषेतून विकसित झाल्या. दोन्हीत शब्द