पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पंथ, चक्रधर स्वामी, लीळा चरित्र याबद्दल त्या क्षणीतरी भाषण देण्यइतकी माहिती नव्हती. पण रेडिओवर भाषण करण्याची मिळालेली संधी सोडायची नाही ठरवून भाषण तयार केलं. पाठवले. त्यांचे काँटॅक्ट लेटर आले आणि मी ध्वनिमुद्रणासाठी थेट तुंगच्या प्रक्षेपण केंद्रावर धडकलो. तिथे गेल्यावर कळले की आकाशवाणी केंद्र मार्केट यार्डच्या एका गोडाऊनमध्ये आहे. केंद्र तरी कसले, एक छोटी खोली. टेबलावर स्पूलचा टेपरेकॉर्डर. बाहेर ट्रकचे हॉर्न वाजायचे. खिडक्या लावून रेकॉर्डिंग पार पडले. वेलणकर नावाचे गृहस्थ होते रेकॉर्डिंगला. खोपडे म्हणून सहायक होते. त्यांना माझे हे पहिले भाषण असूनही आवडले. त्यांनी एक प्रत मागून घेतली. ते भाषण त्यांनी दहिसाथ, अमरावतीहून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक विश्वमंगल'च्या दिवाळी अंकात (४ नोव्हेंबर १९८२) प्रसिद्धही केले. रेडिओच्या भाषणाला मानधन असते, पण भाषण प्रकाशित झाल्यावर ते मिळते, हे या भाषणाने मला दिलेले शहाणपण व पहिली बौद्धिक कमाईपण! आणखी धक्का म्हणजे भाषणाचे पुन:प्रक्षेपणही झाले.
 या तिहेरी सुखद धक्क्यांनी मला आत्मविश्वास दिला नि मी रेडिओ स्टार' होऊन गेलो. मराठी, हिंदी अशी पन्नास एक भाषणे मी सहज दिली असतील. त्यात 'चिंतन'क्षम छोटी भाषणे होती. बारा-पंधरा मिनिटांची दीर्घ भाषणेही. काही भाषणे तर मी ध्वनिमुद्रण न करता थेट दिली. भारतरत्न भीमसेन जोशी यांचे बंधू हम्पीहोली त्या वेळी सांगली आकाशवाणी केंद्राचे संचालक म्हणून होते आणि सुभाष तपासे कार्यक्रम अधिकारी. त्यांनी माझी अनेक थेट भाषणे प्रक्षेपित करून जो विश्वास दाखवला व माझ्या वक्तृत्वाला दाद दिली त्याचे हे कृतज्ञता स्मरण!
 मी रेडिओवरून साहित्य, भाषा, सामाजिक प्रश्न इ. संबंधी भाषणे दिली. रेडिओवरची भाषणे म्हणजे वैचारिक लेखच असतात. विषय आकाशवाणी देते. विचार करायला पुरेसा वेळ असतो. मी वाचून, विचार करून भाषणे तयार करायचो. माझी भाषणे कधीच संपादित झाली नाही. काना, मात्रा, वेलांटीचा फरक न होता सारी भाषणे प्रक्षेपित झाली. त्यातून माझा एक श्रोतृवर्ग तयार झाला. 'सप्रेम नमस्कार' कार्यक्रमात अनेक श्रोते अभिप्राय पाठवत. आकाशवाणीत गेलो की ते वाचण्यास मिळायचे. रेडिओचे सारे अधिकारी, संचालक, अभियंता ऋजू व्यक्तिमत्त्वाचे होते. अनिल कोरे,