पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साधर्म्य आहे, तसे परंपरांचंही. दोन्ही भाषा एकमेकींमुळे समृद्ध झाल्या आहेत. त्यांच्या परस्परपूरक योगदानाचा विचार काही भाषणांतून पुढे येतो. या शिवाय विज्ञान, विवेक, प्रार्थना, इच्छाशक्ती, संस्कार, कुटुंब स्वास्थ्य, पिढीतील अंतर, बालकांचे हक्क, निष्काम कर्मयोग इ. सारख्या जीवनस्पर्शी व जीवनोपयोगी विषयांवर मार्गदर्शनपर भाष्य करताना सदरची भाषणे तुम्हास आढळतील. एकप्रकारे ही भाषणे माणसाच्या सर्व जीवन, विचार व व्यवहाराला वेढतात. त्यावरून त्यांची जीवनोपयोगी दृष्टीही स्पष्ट होते.
 एकविसावे शतक सुरू होऊन एक तपाचा काळ लोटला आहे. हे शतक माहिती व तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. या शतकाने रेडिओ, दूरध्वनी, मोबाईल, संगणक, इंटरनेट, टी. व्ही. चॅनल्स, सिनेमा, वृत्तपत्रे, ग्रंथ, नियतकालिके इत्यादींच्या द्वारे मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे गारूड समाजमनावर घातले आहे. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, संस्कृतीचे सपाटीकरण, ज्ञानभाषेचा विकास इ. अनेक प्रकारे मनुष्य जीवन गतीने केव्हा नि कसे बदलले कळलेसुद्धा नाही. या रेट्यात सर्वाधिक हादरा, धक्का बसला असेल तर तो भाषा, साहित्य आणि संस्कृतीस. ‘संस्कार संजीवनीचे वरदान' शीर्षक भाषणात या सर्व परिस्थितीचा ऊहापोह करून संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ते तुम्ही मुळातूनच अशासाठी वाचले पाहिजे की यात संस्कार घडण, परिणाम, मूल्य इ. बद्दल विस्ताराने विचार करण्यात आला आहे.
 औद्योगिकीरणाचा परिणाम म्हणून जगभर नागरीकरण घडून आले. नगरे, महानगरे म्हणजे सर्व साधन, सोयीची आगरे बनली. उलटपक्षी खेडी कधी काळी स्वयंपूर्ण होती. ती प्रत्येक गोष्टीसाठी शहराकडे धावू लागली. एकत्र कुटुंब पद्धती लयास जाऊन त्याची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विसाव्या शतकात तर केवळ स्वतंत्र राहण्यास मिळते या एकाच आकर्षणाने शिकलेले तरुण शहरी गेले व खेडे तुटले. पण हा क्षणिक मोह भविष्याचा शाप बनला. ते तरुण जेव्हा वृद्ध झाले तेव्हा त्यांची स्थिती धोब्याच्या कुत्र्यापेक्षा कमी शोचनीय नव्हती... 'न घर का, न घाट का स्थितीने वृद्धाश्रमांना जन्म दिला. 'संध्याछाया भिवविती हृदया' भाषणात ही शोकांतिका वाचक, श्रोत्यांना अंतर्मुख करते. अशी भाषणे तुम्हास नागरीकरणाबाबत पुनर्विचार, पुनर्रचना इत्यादीस उद्युक्त करतील असा मला