पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सण आणि सांप्रदायिक सद्भाव

 आपल्याकडे कोणत्याही नव्या गोष्टीचे स्वागत आपण मोठ्या उत्साहाने करत असतो. घरात मुलाचा जन्म होणे, सुनेचे घरातील आगमन, वास्तुशांती, नववर्षाचे स्वागत असे कितीतरी प्रसंग आपल्या आनंदास उधाण आणणारे असतात. आजचा मोहरम सण हा पूर्वी मुसलमानी वर्षाचा प्रथम दिन म्हणून साजरा केला जायचा. पण पुढे हसन व हुसेनची स्मृती म्हणून तो साजरा केला जाऊ लागला. आपल्याकडे सर्व सण नि उत्सव हे सांप्रदायिक सद्भावाचे प्रतीक बनत चालले आहेत. गणेशोत्सव, मोहरम, नाताळ या सणांची ओळख एका धर्म विशेषाचे सण म्हणून आता राहिली नाही. अकबर मोहल्ल्यात गणेश मंडळ स्थापन होते आणि देशपांडे गल्लीतून ताबूताची मिरवणूक निघते हे दृश्य आपल्यातील धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक जसे आहे तसेच ते सांप्रदायिक सद्भावाचे द्योतकही आहे.
 आजच्या भारताचे वर्णन करत असताना असे सांगितले जाते की, हा देश सांप्रदायिकतेच्या ज्वालामुखीवर वसलेला देश आहे. असे वर्णन करणाच्या विदेशी विद्वानांनी खरा भारत अजून ओळखलेला नाही. या देशास महाभारताची परंपरा आहे. आपसात भांडताना आम्ही शंभर नि पाच असू, पण परक्यांशी लढताना आम्ही ‘एकशेपाच' असतो हा आमचा इतिहास आहे. या इतिहासामागे आमचे दृढमूल झालेले सांस्कृतिक संस्कार आहेत. आपल्या देशातील विभिन्नतेत सामावलेली अभिन्नता अभंग आहे ती या सांस्कृतिक ठेव्यामुळेच.

 संस्कृतीचा हा अमोल ठेवा आपण जपायला हवा. आपल्याकडे धर्म, सण, भाषा, साहित्य, चालीरीती या सर्वांत आदान-प्रदान होत असते. सण एक असतो, पण तो विविध रीतीने साजरा केला जातो. दस-यासारखा सण महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे साजरा होतो तर कर्नाटकात त्याचे स्वरूप दिवाळीचे असते. शेतात आलेल्या नव्या धान्याची पूजा भारतातील सर्व प्रांतांत होत

आकाश संवाद/८५