पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या पैकी कशाचाही विचार न करता प्रत्येक बालकाचे काही जन्मजात हक्क आहेत. शारीरिक व मानसिक दुर्बलता लक्षात घेऊन बालवयात त्यांची अधिक काळजी व जपणूक करावी लागते. जन्मापूर्वी व जन्मानंतर सुरक्षेचा बालकांचा हक्क सर्वमान्य असला, तरी त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. बालकांना समृद्ध बालपण बहाल करण्यात समाजाचे कल्याण सामावलेले असते, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
 कोणत्याही कसोटीचा विचार न करता बालकांना सर्व हक्क मिळणे गरजेचे आहे. शारीरिक, मानसिक, नैतिक, आध्यात्मिक व सामाजिक विकासाची संधी आणि सुविधा मिळणे हा बालकाचा जन्मजात हक्क आहे. जन्मतः त्याला नाव व राष्ट्रीयत्व मिळविण्याचा हक्क आहे. त्याला सामाजिक सुरक्षेचे सर्व लाभ मिळायला हवेत. शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या अपंग असलेल्या बालकांच्या विशेष काळजी व जपणूकीची सोय व्हायला हवी. बालकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सुसंवादी विकासासाठी त्याला प्रेम व सलोखा मिळायला हवा. विशेष परिस्थितीचा अपवाद वगळता त्याची मातेपासून फारकत होता कामा नये. त्यांना सक्तीचे मोफत शिक्षण मिळायला हवे. क्रूरता, पिळवणूक दुर्लक्ष या सर्वांपासून त्याला संरक्षण मिळाले पाहिजे. जातीय धार्मिक इत्यादी भेदभाव निर्माण करणाच्या प्रवृत्तीपासून संरक्षण मिळणे हा बालकाचा हक्क आहे. या नि अशा किती तरी हक्कांचा उल्लेख करता येईल. यापैकी आपण किती हक्कांची काळजी करतो हा खरा प्रश्न आहे?

 युरोपमधील अनेक देशात बालकांच्या या हक्कांची पायमल्ली केल्यास तो दखलपात्र गुन्हा समजला जातो. जन्मदात्या आई-वडिलांनी देखील मुलांना मारता कामा नये. अशा परिस्थितीत शेजारी पोलिसात फिर्याद देतो व बाल अपराध नोंदवला जाऊन आता आपल्याकडे निर्माण व्हायला हवी. भारतासारख्या संवेदनशील देशात एक कोटी मुले अनाथ आहेत. त्यांच्या संगोपनाची पुरेशी व्यवस्था अद्याप आपण करू शकलो नाही. अनाथाश्रम आणि बालगृहे सुरू करून आपण जर इतिकर्तव्यता मानत असू तर त्यासारखी शरमेची गोष्ट दुसरी कोणती असू शकणार नाही. अनाथ, निराधार, दारिद्रयरेषेखालील मुले, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी यांची अपत्ये, शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेली मुले या सर्वांना संगोपन, सुरक्षा, संस्कार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे व तो त्यांना मिळवून देणे आपले कर्तव्य आहे. बालकांच्या हक्कांची उपेक्षा होत असल्याने सर्व राष्ट्र अपराधी सिद्ध होते आहे याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा.

आकाश संवाद/८४