पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व वाचिक हिंसेपासून सुरक्षित ठेवण्याचा त्यांनी केलेला उपदेश ‘सर्वठायी समानत्व' शोधण्याच्या वृत्तीचेच निदर्शक आहे. साधकाने हा दुःख देणारा किंवा हा पूजा करणारा असा भेद करता कामा नये असे चक्रधर नेहमी सांगत. त्यांच्या लेखी दोघेही समान असत. ते एके ठिकाणी म्हणतात, “तुम्हा मारिता पूजिता समानचि होआवी की गा।" ज्याच्या अंगी विरक्ती पूर्णपणे बाणली आहे अशा साधकाने मानापमान, निंदा-स्तुती, लाभालाभ हे सगळे समान मानले पाहिजे असे सांगण्यामागे चक्रधरांची समवृत्तीच कारण होती.
 श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या या आचार धर्माचे समग्र मूल्यांकन केल्यावर एक गोष्ट जाणवते की, त्यांनी त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीत ज्या अनेक गोष्टी दुष्ट नि कालबाह्य होत्या. त्यावर प्रहार करून त्या जागी नवा विचारप्रवाह निर्माण केला. प्रबोधन हे खण्डन-मण्डनाचे समन्वित रूप आहे हे लक्षात घेतल्यावर आपणास असे दिसून येते की चक्रधरांनी आपला आचारधर्म हा समाज प्रबोधनासाठीच निरूपित केला होता. धर्म नि भक्तीद्वारे समाज विकासाचे ध्येय ठेवणारे श्री चक्रधर स्वामी हे जसे संत होते तसेच ते समतेचे पुरस्कर्ते नि समाज प्रबोधकही होते.

 प्राचीन मराठी संतांनी आपल्या विचार नि वाङ्मयाद्वारे जे सामाजिक उत्थानाचे महत्कार्य केले त्यात श्री स्वामींचे कार्य हे आगळी गुण वैशिष्ट्ये घेऊन आपल्यासमोर येते. चक्रधर जसे सर्वज्ञ होते तसेच ते स्वप्रज्ञही होते. ईश्वर, धर्म, भक्ती, समाज, भूतदया, मानवता यांसारख्या अनेक गोष्टींवर त्यांनी केलेले भाष्य हे सर्वथा परंपरेवर प्रहार करणारे नि मूलगामी होते. धर्म ही। अफूची गोळी हे खरे आहे, पण तिचा जर विधायक उपयोग करून घेतला तर तिच्यासारखी समाज सुधारणेची रामबाण मुळी दुसरी कोणतीही असणार नाही याचे पुरे भान चक्रधरांना असल्याचे पदोपदी जाणवते. चक्रधर कवी, संत, पंथ संस्थापक होते हे नाकारता येणार नाही. साधक, अनुयायी यांच्या आचरणासंदर्भात चक्रधरांनी केलेले विस्तृत विवेचन विचारांपेक्षा आचाराचे महत्त्व विशद करते. धर्म म्हणजे आदर्श नीतीतत्त्वांचा संग्रह. पण ही नीतितत्त्वे ब-याचदा शाब्दिक नि वाचिक स्तरावर सुरक्षित असतात. चक्रधरांनी शाब्दिक नि वाचिक तत्त्वांचा काथ्याकूट करण्यापेक्षा वर्तन, परिवर्तनावर भर दिला. चक्रधरांचे द्रष्टेपण सिद्ध होते ते इथेच. वेद पठण, नामस्मरण, पूजाअर्चा सारख्या कर्मकाण्डाला शह देऊन मानवी मूल्ये जोपासणारी समतेची शिकवण देऊन चक्रधरांनी महाराष्ट्रास पुरोगामी बनवले आहे. प्राचीन मराठी संतांच्या प्रबोधन परंपरेत चक्रधरांची समता एक व्यवच्छेदक व्यक्तिमत्त्व घेऊन पुढे येते, यातच चक्रधरांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे.

आकाश संवाद/७४