पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनाचा महान संदेश देण्याची हातोटी केवळ चक्रधरांमध्येच आपल्याला दिसून येईल. विशिष्ट बुद्धी हे विषमतेचे उगमस्थान आहे हे मर्म चक्रधरांनी बरोबर ओळखले होते. विशिष्टता ही आत्मीयता आहे नि तिच्यामुळे आपपर भेद वृत्ती उदयाला येते म्हणून सर्वांशी समान प्रेमपूर्ण वर्तन करण्याची शिकवण जेव्हा चक्रधर देतात तेव्हा त्यामागे समतेची स्थापना करण्याचाच आग्रह असतो, हे वेगळे सांगायला नको.
 श्री चक्रधर स्वामींचे अवतारकार्य हे बाराव्या तेराव्या शतकातले. या काळात एकीकडे चातुर्वण्र्याच्या आधारावर जशी विषमतेची बीजे पेरली जात तशीच ती स्त्री-पुरुष भेदाच्या आधारेही पेरली जात असत. चक्रधर हे सर्व प्रकारच्या विषमतेविरोधी बंडाचा झेंडा उभारणारे संत होत. आपल्या विचारबंध या ग्रंथात उत्तम म्हणजे ब्राह्मण अन् अधम म्हणजे मातंग' या वृथा कल्पनांचा जसा त्यांनी विरोध केला आहे तसा 'लीळा चरित्रात त्यांनी स्त्री-पुरुष भेदाचाही केला आहे. त्या काळी शूद्राप्रमाणे स्त्रीसही साधना करण्याची अनुमती नव्हती. चक्रधर स्त्री शूद्रादिकांना इतरांबरोबर आपल्या पंथात प्रवेश देऊन थांबले नाहीत, तर त्यांना इतरजनांबरोबर मोक्षाचा अधिकार बहाल केला. धर्म नि भवतीस पुरुषाची मिरासदारी करू पाहणा-या पुरुषप्रधान विचार चिंतनास चक्रधरांनी सुरुंग लागला. स्त्री रजःस्वला होते म्हणून ती अपवित्र असते अशा बुरसटलेल्या विचारांना चक्रधरांनी कधीच थारा दिला नाही. ते भक्तीत बाह्य शुचित्वापेक्षा आंतरिक शुचित्वास अधिक महत्त्व देत. आपली शिष्या महदाइसेला रजस्वला स्थितीत विटाळ पाळण्याची आवश्यकता नसल्याने सांगताना ते म्हणतात. “मनिचे अभिलास निवर्तले, तरि शुचि अशुचि ये दोन्ही नाहीकी गा एका।" हे त्यांचे विचार स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कारातूनच निर्माण झाल्याचे दिसून येतात. ज्या काळात स्त्रीस घराचा उंबरा ओलांडायचेसुद्धा स्वातंत्र्य नव्हते अशा काळात स्त्री समानतेसंबंधातील चक्रधरांचे हे विचार क्रांतिकारकच म्हणावे लागतील.

 दैनंदिन जीवनातील मनुष्याच्या आचरणात येणारे छोटे-मोठे प्रसंग हे कधी कधी विषम आचरणाचे अधिष्ठान असते हे लक्षात घेऊन चक्रधरांनी लोकांना समबुद्धीने वर्तन करण्याची शिकवण दिली आहे. त्यांनी निरूपण केलेल्या आचार धर्मात छोट्या छोट्या गोष्टीतूनही समानतेची बीजे दृढमूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. “तुम्ही चतुर्विद्या भूतग्रामा समय देवावे असे म्हणत सर्व प्राणीमात्रांविषयी समभाव ठेवण्याचाच उपदेश केला आहे. साधकाने सगळ्या प्राणिमात्रांना अभय द्यावे, त्यांचे भीतीपासून संरक्षण करावे. आपल्या शारीरिक क्रियेने व वाचिक शब्दांनीच नव्हे, तर नुसत्या दर्शनानेही किडामुंगीला भीती वाटू नये याची काळजी घ्यावी, सर्व प्राणिमात्रांना शारीरिक, मानसिक

आकाश संवाद/७३