पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महानुभाव पंथ आणि एकात्मता

 महानुभव पंथ हा हिंदू धर्मात प्रचलित असलेला एक संप्रदाय होय. जनसामान्य त्यास मानभाव पंथ या नावाने ओळखतात. महानुभव शब्दास काहीशा कुत्सित दृष्टीने पाहण्याच्या तत्कालीन प्रवृत्तीमुळे मानभाव' शब्द रूढ झाला. खरं तर महानुभाव पंथ हा प्रचलित सर्व धर्म, संप्रदायांपेक्षा अत्यंत उदारवादी, समतावादी असा धर्म पंथ होय. संस्कृत पंडितांनी महानुभाव शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना म्हटले आहे की, “महान अनुभवः तेजः बलं वा यस्य स महानुभावाः' अर्थात मोठा अनुभाव म्हणजेच मोठे तेज किंवा बल ज्याचे असा तो महानुभाव. महानुभाव शब्द श्रेष्ठ, बलशाली पुरुषाचे विशेषण म्हणून वापरण्यात येतो. पंथास असे नाव देण्यामागे संस्थापक श्री चक्रधरांची पंथांचे आगळेपण सिद्ध करण्याचीच भावना असावी हे उघड आहे.
 इसवी सनाच्या तेराव्या शतकात वहाड प्रांतात चक्रधरांनी स्थापन केलेला हा पंथ आरंभापासूनच एक समृद्ध पंथ म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्या लोकाभिमुख वृत्तीमुळे या पंथाने अल्पावधीतच पंजाब, मध्य प्रांत, सरहद्द प्रांत, काश्मीरपर्यंत पाय पसरले. तेराशे व सोळाशे शतकाच्या तीनशे वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ काळात या पंथाने आपली मोहिनी टिकवून धरली. त्याचे सर्व श्रेय पंथाच्या एकात्म वृत्तीस द्यावे लागेल. तेराव्या शतकाचा काळ हा धर्म नि पंथांचा सुकाळ असलेला काळ होता. हिंदू, मुसलमान, जैन, बौद्ध इत्यादी सर्व धर्मात छोटे छोटे पंथ आकार घेत होते. धार्मिक, कट्टरतेविरुद्ध धार्मिक उदारतेच्या संघर्षाची फलनिष्पत्ती म्हणून हे छोटे छोटे पंथ साकारत होते. महानुभाव पंथाचा उदयही काहीशा अशाच परिस्थितीत झाला.

 शंकराचार्यांनी अद्वैतवादी धर्मचिंतनाची प्रतिष्ठापना करण्याला तीन चारशे वर्षे लोटली होती. या तीन-चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत धर्माच्या सप्त स्वरूपाचे जवळपास विस्मरण झाले होते. धर्माच्या नावावर प्रस्थापित झालेली

आकाश संवाद/७५