पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री चक्रधर स्वामींची समता

 महाराष्ट्र हा जसा पाषाणांचा देश आहे तसाच तो पाषाणास पाझर फोडणाच्या संतांचाही देश आहे. रेड्यामुखी वेद वदविण्याची असाधारण किमया ज्ञानदेवांसारखा प्राचीन मराठी संतच करू शकतो. प्राचीन मराठी संतांनी धर्म नि भक्तीचे पारंपरिक स्वरूप अंधश्रद्ध वृत्तीने कधीच जोपासले नाही. समाज धोरेति धर्मः' अशी धर्माची व्यापक व्याख्या शिरोधार्य मानून त्यांनी समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन म्हणून भक्तीचा स्वीकार केला. महाराष्ट्रात आर्यांनी सुरू केलेल्या यज्ञप्रधान वैदिक परंपरेपासून जितके प्राचीन संत होऊन गेले, त्या सर्वांनी भक्तीचे वैश्विक स्वरूप अंगीकारले होते. मराठी संतांच्या या उदारमतवादी धोरणामुळे अन्यत्र दिसून येणारे सांप्रदायिक संघर्ष महाराष्ट्रात अपवादानेच दिसून येतात. नाथ, महानुभव, दत्त नि वारकरी संप्रदायातील अग्रणी संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, तुकाराम, चक्रधर या सर्वांनी भक्तीचे सर्वसमावेशक रूप प्रस्थापित केले. परिणामतः महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे वारे विकल्परहित समाज रचनेचा पुकारा प्रभावीपणे करू शकले हे आपणास नाकारता येणार नाही. या प्राचीन संत परंपरेत महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींचे धर्म चिंतन व्यवच्छेदक मानावे लागेल. परमेश्वराच्या वास्तव स्वरूपाची ओळख करून देऊन जनमानसास मोक्षाचा खरा मार्ग मिळवून देण्याचा श्री चक्रधर स्वामींनी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न हे त्यांचे अवतारकार्य मानले जाते नि ते खरेही आहे. चातुर्वर्ण्य विरोध, स्त्रीस मोक्षाचा मार्ग खुला करणे, हरिजनांना साधनेची कवाडे खुली करणे ही नि अशी किती तरी उदाहरणे श्री चक्रधरांना समकालीन संतांच्या पाश्र्वभूमीवर समतेचा खरा उद्गाता म्हणून सिद्ध करायला पुरेशी आहे.

 श्री चक्रधर स्वामींनी आपल्या पंथीय अनुयायांसाठी ‘असतिपरि' शीर्षकांतर्गत आचार धर्माचे जे निरूपण केले आहे ते पाहिले की चक्रधर हे समानतेने पुरस्कर्ते

आकाश संवाद/७१