पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते हे कळायला वेळ लागत नाही. त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा निःसंदिग्ध शब्दात केलेला विरोध या संदर्भात पाहण्यासारखा आहे. महानुभावी साधकाने भिक्षा कशी मागावी या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी चातुर्वर्ण्य चरद मैक्ष्यमः या शास्त्रासि अनुसरिजे' अशी आज्ञा करून हेच स्पष्ट केले आहे की। साधकाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या सर्व वर्णाच्या घरी भिक्षा मागावी. त्यात त्याने हा ब्राह्मण, हा शूद्र असा भेदभाव करू नये. त्या काळात लोक पाणीही ठराविक वर्षांच्या घरचेच पीत असत. विशिष्ट वर्णाच्या घरचे पाणी पिणे हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील एक नीती तत्त्वच होते. चक्रधरांनी या संदर्भात ही आपल्या अनुयायांना उपदेश केला आहे. “तुम्हा बोडी गंगा समानचि हो आवी की गा" हे त्यांचे संतवचन हेच सांगते की कोणत्याही वर्णाच्या घरी अन्न खायला जशी हरकत नाही तशीच कोणत्याही वर्णाचे घरी पाणी प्यायलाही हरकत नाही. इथले पाणी पवित्र आणि तिथले पाणी अपवित्र असा भेद साधकाने मानता कामा नये. साधकाच्या दृष्टीने पाणी गंगेचे असो की डबक्यातले, ते सारख्याच योग्यतेचे आहे. त्याने दोहोच्या ठिकाणी समानता मानली पाहिजे असे सांगून चक्रधरानी समतेचे समर्थनच केले आहे. चक्रधरांचे समग्र जीवन हे आचार विचारांच्या समन्वयाचे आदर्श उदाहरण आहे. चातुर्वर्ण्य विरोधाचा ते उपदेश करून थांबले नाही. “आधी केले नि मग सांगितले." या उक्तीनुसार त्यांनी मातंगाच्या हातून प्रसाद सेवन केला होता नि हरिजनाच्या घरी भोजनही केले होते या गोष्टी सर्वश्रुत आहेत.

 श्रेष्ठांनी कनिष्ठांशी अत्यंत प्रीतीपूर्वक वर्तन करण्याची चक्रधरांनी दिलेली शिकवण हे समतेचे आणखी एक ठळक उदाहरण म्हणून सांगता येईल. उद्धवदेव नि विदुराच्या भेटीचा दृष्टांत देऊन त्यांनी सर्वांशी प्रेमपूर्वक संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला आहे. श्रेष्ठ जर कनिष्ठांशी प्रेमपूर्ण व्यवहार करतील तर कनिष्ठास परमेश्वर भेटीचा आनंद होईल असे सांगून त्यांनी प्रीतीपूर्वक वर्तनाचे महत्त्व विशद केले आहे. या सृष्टीतलावर एकत्र झालेले सर्व जण एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. त्यामुळे त्या सर्वांचा धर्म ही एक आहे. एकु देवो, एकु धर्म, तया परस्पर परमप्रीती हो आवी की" असे म्हणत चक्रधरांनी धार्मिक एकात्मतेकडे, समानतेकडेच अंगुलीनिर्देश केला आहे. या सृष्टीत देव, धर्म या सर्वच कल्पना एकात्म असल्यामुळे मानवाचे एकमेकांशी असलेले आचरणही एकात्म नि समानतेचे असले पाहिजे हा चक्रधरांचा आग्रह त्यांना वैश्विक पातळीवर विराजमान करतो. मनुष्याने एकमेकांवर प्रेम करावे पण या प्रेमात आपार बुद्धी नसावी हे देखील सांगायला चक्रधर विसरले नाहीत. नामदेवाची सेवा करण्याच्या संदर्भात महदाइसेला चक्रधर म्हणतात. “बाई : परम प्रीती कीजे।. परि विशिष्ट बुद्धी न कीजे।' सहज नि सोप्या शब्दांत

आकाश संवाद/७२