पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मराठी साहित्यावरील हिंदी भाषेच्या प्रभाव व परिणामाचे विहंगमावलोकन करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की मराठी भाषा व साहित्यावर प्रारंभापासूनच हिंदी भाषेचा फार मोठा पगडा बसला आहे. अलीकडच्या काळात हिंदीस लाभलेला शासकीय वरदहस्त, चित्रपट, दूरदर्शनमुळे जनमानसात या भाषेची रुजलेली बीजे, महानगरीय जीवनात हिंदीच्या रोजच्या व्यवहारातील सर्रास वापर इत्यादीमुळे हिंदी केवळ अपुरी राहिली नसून ते एक राष्ट्रीय विचार माध्यम बनले आहे. एके काळी केवळ उत्तर प्रांतांची भाषा असे हिंदीचे रूप आहे. आज या राष्ट्रीय विचार बनलेल्या भाषेचा मराठीवरच काय पण समग्र भारतीय भाषांतील साहित्यावर मोठा पगडा आहे व दिवसेंदिवस तो काळाची गरज म्हणून वाढतच जाणार आहे. कोणतीही भाषा अथवा साहित्य स्वबळावर वाढते आणि विकसित होत असते हे जरी खरे असले, तरी त्या भाषेतील आशय गहनता ही संपर्क भाषातून येत असते हे नाकारून कसे चालेल? या प्रसंगी ज्ञानदेवांचे विचार आठवल्यावाचून राहात नाहीत. त्यांनी म्हटले होते, ‘‘संतहो, मी हे सारस्वताचे गोड झाड लावतो आहे. तुम्ही त्याची फळे प्रेमाने तोडून घ्या. कृष्णार्जुनाच्या संवादाच्या प्रमेयांची उद्याने ‘इथे मराठीचित्रे नगरी लावून मी इथे ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन." मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ आणण्यासाठी, तिच्या ‘अमृतातेही पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आणण्यासाठी हिंदीसारख्या भाषा भगिनीच्या निकट साहचर्याची व संपर्काची गरज आहे. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीनुसार मराठी, हिंदी भाषा भगिनी उदारतेने आदान-प्रदानाची ही प्रक्रिया भविष्य काळातही अखंडपणे चालू ठेवतील तर निश्चितच त्या साच्या विश्वाला प्रभावी साहित्याचा अमोल ठेवा देऊ शकतील.

आकाश संवाद/७०