पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जबाबदाच्या सर्व समान असायच्या. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असा अलिखित संकेत पाळणाच्या या कुटुंबाचे स्वास्थ्य खरोखरच दृष्ट लागण्यासारखे असायचे. पण अलीकडच्या काळात आर्थिक संघर्ष, औद्योगिकीरण, नागरीकरण, विवाह संस्थेतील स्थित्यंतर, व्यक्तिवाद, स्वातंत्र्य अशा अनेकविध कारणांनी संयुक्त कुटुंबे लोप पावत चालली आहेत. जगभर सर्वत्र विभक्त कुटुंबाचा पुरस्कार केला जातो आहे. असे असले, तरी भारतासारख्या विकसनशील देशात अजूनही आई वडील, त्यांची अपत्ये व अपत्यांची कुटुंबे अशा दोन-तीन पिढ्यांची कुटुंबे एकत्र राहतात. तिथे पिढीतील अंतरामुळे कौटुंबिक स्वास्थ्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. या प्रश्नाचे आर्थिक, सामाजिक असे अनेक पैलू असून आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्षांच्या (१९९४) निमित्ताने का असेना, त्यावर विचार करणे गरजेचे झाले आहे.
 एकाच कुटुंबात राहणा-या दोन पिढ्यांमध्ये सरासरी वीस वर्षांचे अंतर असते. वीस वर्षांचा काळ समाज परिवर्तनाच्या संदर्भात अल्प असला, तरी कुटुंबाच्या स्वरूपात मात्र तो मूलभूत बदल घडवून आणणारा असतो. शिक्षण, राहणीमान, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, जीवन संघर्ष, विकास व उत्पादन साधने या संदर्भात दोन पिढ्यांतील फरक आणि अंतर हे दोहोत फारकत निर्माण करू शकेल इतके असते. पिढीतील वैचारिक व दृष्टिगत अंतरामुळे समाजात बदल होतात हे खरे, पण नेमक्या या अंतराचाच परिणाम गृहस्वास्थ्यावर होत असतो, हे मान्य करायलाच हवे.

 आजच्या आपल्या जीवनातील बदलाचे निरीक्षण करताना आपणास असे लक्षात येते की, एकाच कुटुंबात जिथे दोन पिढ्या एकत्र राहतात तेथील वडील पिढी ही तरुण पिढीस मागास वाटत असते. वडील पिढीचे अल्प शिक्षण, साधनांची मर्यादा, पूर्वसुरींच्या संस्कारांमुळे जगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वृत्ती, राहणीतील साधेपणा, या नि अशा कितीतरी गोष्टी तरुण पिढीला जाचक वाटत असतात. याचे एकमेव कारण जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातच मूलभूत फरक असतो. पूर्व पिढी समर्पणाचे आवाहन करत असताना नवी पिढी मात्र उपभोगाच्या मागे पळत असल्याचे चित्र सार्वत्रिकपणे दिसून येते. या अंतरामुळे परस्पर सामंजस्य अभावानेच दिसून येते. व्यक्तिवाद, स्वातंत्र्य, भौतिक समृद्धीचा हव्यास, चंगळवाद इत्यादीसारख्या नवमतवादी फरकामुळे आज कौटुंबिक स्वास्थ्य हरवून गेले आहे.

आकाश संवाद/४६