Jump to content

पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पिढीतील अंतर आणि कौटुंबिक स्वास्थ्य

 कुटुंब हा आपल्या समाजाचा मूलभूत घटक आहे. त्याला समाजाचे हृदयही म्हटले जाते. मानवाच्या प्रारंभिक काळापासून समाजात कुटुंबसंस्था अस्तित्वात आहे. हे खरे आहे की, कालपरत्वे कुटुंबाचे स्वरूप बदलत आले आहे. विवाह, रक्तसंबंध, दत्तकविधान, नातीगोती, वास्तव्य अशा कितीतरी अंगांनी कुटुंब आकार घेत असते. अलीकडे पती, पत्नी व त्यांची अपत्ये यांच्या परीघातच कुटुंब सामावलेले दिसते. मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास आपण पाहू लागलो तर पूर्वी कुटुंब ही व्यापक कल्पना होती. टोळ्या, गट, गाव यांना कुटुंबाचे रूप असायचे. सार्वत्रिकपणे व सार्वकालिकपणे कुटुंबाचे जे रूप प्रचलित आहे त्यात विवाह बंधनांनी बांधलेल्या स्त्री-पुरुष संबंधाने अपत्यांसह साकारलेला गट म्हणजे कुटुंब. या कुटुंबाची विशिष्ट कार्ये परंपरेने निश्चित केलेली आहेत. संगोपन, संस्कार, शिक्षण, स्वावलंबन, मनोरंजन व पुनर्वसन अशा कितीतरी अंगांनी माणसाची घडण होत असते. एका अर्थाने समाजशील माणूस घडवणारी ती प्रयोगशाळाच असते. प्रत्येक कुटुंबाची स्वतःची अशी परंपरा नि प्रतिष्ठा असते. कुटुंबाचे समाजातील स्थान हे या परंपरा आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते. प्रत्येकास कुटुंबाची ओढ असते, कारण कुटुंबच माणसास मानसिक व शारीरिक स्वास्थ्य देत असते. माणसाच्या अनेक दैनिक गरजांची परिपूर्ती होते ती कुटुंबामुळेच.

 कौटुंबिक स्वास्थ्य हा सामाजिक आरोग्य व शांतीचा पाया मानला गेला आहे. ज्या देशात कुटुंब स्वास्थ्याचा गंभीरपणे विचार केला जातो ते देश प्रगती करतात, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. आपल्या देशात पूर्वी संयुक्त कुटुंबे होती. आजोबापासून ते नातवापर्यंतच्या किती तरी पिढ्यांची कुटुंबे एका घरात गुण्यागोविंदाने राहात असत. अशा घरात वडीलधा-यांचा आदर केला जायचा. अंध, अपंग, विधवा, परित्यक्तांना अभय असायचे. संपत्ती, हक्क,

आकाश संवाद/४५