पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पिढीतील अंतरामुळे हरवलेल्या कुटुंब स्वास्थ्याचा विचार दोन पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. अंतराचा पूर्वपिढी संदर्भातील प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो स्वतःच्या पिढीसंदर्भातही महत्त्वाचा आहे. मुला-मुलींच्या नव्या पिढीचे आई-वडिलांच्या जुन्या पिढीशी जे मतभेद आहेत, ते केवळ वैचारिक नाहीत तर ते दैनिक जीवनातील अनेक छोट्या छोट्या प्रश्नांच्या संदर्भातही दिसून येतात. मुलाचे लाड करायचे की नाही, मुलाला कोणत्या शाळेत घालायचे यापासून ते मूल व सुनेने सिनेमाला जावे की नको, सुनेने साडी। नेसावी का कमीज कुर्ता घालावा यापर्यंत हे मतभेद असतात. जिथे तिथे आता व्यक्तिस्वातंत्र्य मान्य झाल्याने नवी पिढी आग्रही राहते. परिणामी, वडील पिढीचा अनादर, उपेक्षा, त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य हरवणे असे गंभीर प्रश्न आता घरोघरी दिसून येतात. आई-वडिलांच्या भौतिक गरजांची पूर्ती केली की आपली जबाबदारी संपली असे मानणारी मोठी नवी पिढी समाजात सर्वत्र दिसते. आपल्या आई-वडिलांची मानसिक व भावनिक भूक दुर्दैवाने नवी पिढी विचारात घेत नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या पिढीची होणारी कुतरओढ हा आज खरा चिंतेचा विषय आहे. पण आई-वडिलांना स्वतंत्र घर देणे, अगदीच मोठा प्रश्न असेल आई-वडील वृद्ध, अपंग असतील तर त्यांची सोय वृद्धाश्रमात करणे यातच इतिकर्तव्यता मानणाच्या पिढीने फिरून अंतर्मुख होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
 पिढीतील अंतराचे पूर्वपिढीवर होणा-या परिणामांइतकेच गंभीर परिणाम आज वर्तमान तरुण पिढीवर होत आहेत व त्याचा कुटुंब स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होतो आहे. वडीलधाच्या माणसांचे वर्चस्व व धाक न राहिल्याने पुरुष वर्गात स्वेच्छाचारी वृत्ती बळावते आहे. व्यसनांचे वाढते प्रमाण हेच सांगते. स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलांकडे पाहण्यास आज वेळ नसल्याच्या तक्रारी ऐकू येऊ लागल्या आहेत. पाळणाघरात वाढणारी नवी पिढी कोणते संस्कार घेऊन विकसित होणार आहे? चंगळवादी संस्काराने आपण मानवी संबंधांनाच छेद तर देत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरावर आपले कुटुंब सुख अवलंबून आहे. परस्पर व उपेक्षाही भूमितीच्या पटीने वाढत निघाल्याने समाजातील कुटुंबे ही विध्वंसाच्या निद्रिस्त ज्वालामुखी विवरावर बसल्यासारखी स्थिती आहे.

 या सर्व परिस्थितीचा विचार करून जो बदल आपणास कुटुंब व्यवस्थेत अभिप्रेत आहे त्याची सुरुवात कुटुंबापासूनच व्हायला हवी. त्यासाठी आपल्या घरात काही संस्कार व परंपरा आपण जाणीवपूर्वक जपल्या, जोपासल्या पाहिजेत. वडील माणसांचा आदर अगोदर स्वतः करायला शिकले पाहिजे.

आकाश संवाद/४७