पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिरायची वृत्ती सोडून द्यायला हवी. साध्या समाधानाचा अमृतकुंभ मनोवृत्ती भरते म्हणतात. 'मन चंगा तो कटौती में गंगा' हे लक्षात घेतले पाहिजे.
 आजी-आजोबांचे वय वाढेल तसे विकार वाढतात. परावलंबीपणा वाढतो. अशा वेळी घरातील सर्वांनी त्यांच्यासाठी वेळ द्यायला हवा. त्यांची सोबत करायला हवी. त्यांच्या औषधाच्या वेळा पाळाव्यात. वाचून दाखवणं, फिरायला नेणे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना गुंतवणे असे प्रयत्न करणे म्हणजेच त्यांच्याशी मैत्री करणं होय. आपले असे वागणे त्यांच्या जीवनातील पोकळी भरून काढेल. त्यांचे आयुष्य वाढवेल. घर वा वृद्धाश्रम त्यांना तुरुंग वाटता कामा नये. आजी, आजोबा उतारवयात आत्मविश्वास गमावतात. अशा वेळी आपण त्यांना धीर द्यायला हवा. ती त्यांची खरी गरज असते. त्यांचा वेळ जावा म्हणून काळजी घ्यायला हवी. त्यांना मनोरंजन साधने पुरवणे, मनाप्रमाणे खाऊ घालणे, त्यांच्या छोट्या छोट्या इच्छांचा आदर व पूर्तता करणे अशातूनच पिढीतील अंतर, संघर्ष कमी व्हायला मदत होते. त्यांच्या अपेक्षा माफक असतात. त्यांची पूर्तता करायला हवी. आपले कोणीतरी आहे. आपली कोणीतरी काळजी घेते हा दिलासा त्यांना पुरेसा असतो.
 असे सांगितले जाते की माणसाचा साठाव्या वर्षीचा चेहरा ही त्याच्या आयुष्याची, व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख. प्रसन्न चेह-याचे, उमद्या मनाचे आजी, आजोबा हे घरातील सौजन्यपूर्ण वातावरणाचे साक्षीदार असतात. ज्या घरात आजी आजोबा अडगळ म्हणून जगत असतात त्या घराचे सौख्यही अडगळीत पडते म्हणे! अडगळीचे आयुष्य आजी, आजोबांना देणे म्हणजे रोज मरणयातना देणे असते! यासारखा करंटेपणा दुसरा कोणता असूच शकत नाही. घरातील आजी, आजोबा हे आपलं वैभव म्हणून जोपासायला हवे. त्यांच्याबरोबर मैत्री करण्याने आपल्या जगण्यातील सार्थकता, समाधान वाढते.

 आजी-आजोबा होणे ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही. वाढत्या वयाबरोबर माणसाच्या स्वभाव, वृत्ती, अपेक्षांत फरक पडत असतो. हा काळ तुलनेने हट्ट, आग्रह, अहंकाराचा काळ होय. ते समजून घेऊन घरातल्यांनी नमतं घेऊन, समजून घेऊन पुढे जायला हवे. यामुळे आपण त्यांचे आयुष्यच नाही वाढवत तर समाधान ही वाढवत असतो. या सर्वांसाठी घरातल्या जाणत्या मंडळींनी उदार व्हायला हवे. आजी आजोबा म्हणजे कालच्या तारखेचे वर्तमानपत्र. रद्दीसारखे त्यांच्याकडे तुच्छतेने पाहण, हेटाळणे केवळ असंस्कृतपणाचं लक्षण समजले पाहिजे. आजी-आजोबा आपल्या उद्याच्या जीवनाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्या अनुभवाचा ठेवा आपणास किती तरी संभाव्य संकटांपासून वाचवू शकतो.

आकाश संवाद/३२