पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुटुंबाची जागा विभक्त घरांनी घेतली आहे. आपले शिक्षणमान उंचावले. त्यामुळे स्त्री-पुरुष दोघेही नोकरी व्यवसाय करू लागलेत. खेड्यात पण असेच चित्र दिसू लागलेय. त्यामुळे आजी-आजोबांकडे, त्यांच्या अपेक्षा नि गरजांकडे पाहायला वेळ उरला नाही. व्यक्तिस्वातंत्र्य विकसित झाले. त्याचा दुष्परिणाम झालाय. 'तुझे तुला आणि माझे मला' असा विभाजनवाद प्रत्येक व्यक्तीत रुजलाय. या सगळ्या बदलामुळे आजी, आजोबा एकटे पडले नाही तर वय वाढेल तसे त्यांचे परावलंबित्व वाढते आहे. घर खायला उठतं त्यांना. वेळ जाता जात नाही. अधू दृष्टी, कमी ऐकू येणे, सांधे धरणे, अपचन अशा अनेक कारणांनी लहान बाळासारखी त्यांची काळजी करणे, त्यांच्याशी मैत्री करणे, बंधुभाव जोपासणे आवश्यक होऊन बसलय.
 आजी-आजोबांशी मैत्री सर्वांनी करायला हवी. मुलांनी आपले जन्मदाते म्हणून अत्यंत कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहायला हवे. आदर ठेवायला हवा. त्यांचं मन राखायला हवे. दुखलं-खुपलं पहावे. त्यांच्या स्वभाव दोषांचा बाऊ करू नये. त्यांना समजून घ्यावे. नातवांना पण हीच शिकवण द्यायला हवी. ब-याच घरात नातवंडांचा पाश तोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा पाश जोपासायला हवा. ही दोघांची गरज असते. नातवंडे आजी-आजोबांकडे चांगली रमतात. संस्कारित होतात. प्रेम मिळते त्यांना. समाजाने पण आजी, आजोबांकडे अधिक उदारपणे पहायला हवे. आजी-आजोबांचे पिकलेले केस हे त्यांच्या अनुभवजन्य शहाणपणाचे प्रतीक असते. त्यांच्या ज्ञान, अनुभव व कौशल्याचा फायदा करून घेण्याची योजना हवी. आपणाकडे आजी, आजोबांची फुरसत हे वरदान ठरू शकते. निवृत्त शिक्षक, डॉक्टर, वकील, कितीतरी उपकारक सल्ला व सेवा देऊ शकतात. शासनाने पण कल्याण व विकासाच्या योजना आखून घराघरांतील आजी, आजोबांची काळजी घेण्याचे धोरण स्वीकारायला हवे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी आपणापुढे आजी, आजोबांच्या सुविधांचा आदर्श ठेवला आहे. हे देश म्हणजे वृद्धजनांचे स्वर्गच होत. भौतिक समृद्धीबरोबर आजी-आजोबांना भावनेचा ओलावा पण लाभायला हवा. आजी-आजोबांच्या भावना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी मैत्रीसारखे दुसरे साधन नाही.

 त्यासाठी आपणास आजी, आजोबांच्या मनाची ठेवण समजून घ्यायला हवी. त्यांचा स्वभाव ओळखायला हवा. त्यांच्या आवडीनिवडी समजून घ्यायला हव्यात. हे करताना आजी, आजोबांनी हट्टी स्वभाव सोडायला हवा. वाढत्या वयाचं वास्तव मनापासून स्वीकारायला हवे. शिंग मोडून वासरात

आकाश संवाद/३१