आजी-आजोबा हे आपल्या पूर्व पिढ्यांचे संचित असते. संस्कार, परंपरा, ज्ञान, रीतिरिवाज, लोकसाहित्य यांचा तो सतत वहाणारा झरा असतो. हे पूर्व संचित आपल्या हाती तेव्हाच लागेल, जेव्हा त्यांच्याशी आपला मैत्रीपूर्ण संवाद राहील. मला आठवतं. माझी आई शिकलेली नव्हती. पण प्रसंगानुरूप इतक्या म्हणी नि वाक्यप्रचार ती वापरायची की तिच्या जिभेवर नाचणाच्या त्या शहाणपणाचा मला अचंभा वाटायचा. आणि खरे सांगायचे तर हेवाही वाटायचा. आपले सारे शिकणे, पदव्या तिच्या त्या हजरजबाबी दृष्टान्तांपुढे कोत्या वाटायच्या. आजी, आजोबांच्यात अनेक पिढ्यांचे शहाणपण संपृक्त असते. त्यांचा आदर नि मैत्री करायची, ती या अमोल ठेव्याच्या जपणुकीसाठी!
आजो-आजोबा मला लाभले नाहीत. ज्यांना लाभले ती मंडळी जेव्हा त्यांना हेटाळताना पाहतो तेव्हा मनस्वी दु:ख होते. ते दु:ख असते पिढीच्या अदूरर्शितेचे. “दैव देते नि कर्म नेते' म्हणतात ते अशा वेळी प्रकर्षाने खरे वाटायला लागते. आजी, आजोबा जिवाचे मैत्र झाले तर तुम्हास त्यांच्या बटव्यातील जीवन संजीवनी जडीबुटीही मिळेल व संस्कार संदुकीतील जडजवाहीरपण!