पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वच मान्य करत असतो. म्हणून इच्छाशक्ती वापराबद्दल माणसाने अधिक चोखंदळ रहायला हवं.

 आज आपला देश ज्या एका भीषण परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे, ते पाहता मला इच्छाशक्ती वापराच्या आपल्या पारंपरिक पद्धतीची पुनर्रचना, पुनर्बाधणी, पुनर्माडणी करावीशी वाटते. प्रत्येक माणसाने आपल्या व्यक्तिगत इच्छेच्या जागी समाज इच्छेस महत्त्व द्यायला हवे. इच्छेचा वापर धर्माच्या संदर्भात ‘बाबा वाक्यं प्रमाणं' सारख्या अंधश्रद्धेनी करून चालणार नाही. ‘समाज धारेय इति धर्मः' अशी धर्माची सामाजिक व्याख्या शिरोधार्य मानण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ‘नहीं गोध्रा, नहीं गोहत्ती, भारत माँ यही हमारी मिट्टी असं जोवर आम्ही अंतर्मनातून म्हणणार नाही तोवर देशावरील मळभ दूर होणार नाही. जपान, इस्त्रालयसारख्या देशाच्या विकासाचे वस्तुपाठ आपण गिरवले तर आपण इच्छाशक्ती वापर आधुनिक पद्धतीने केला असे समजण्यात येईल. पोखरण आपल्यावर लादलेले संकट असेल, पण तुर्भे आपण स्वीकारलेले स्वप्न वाटायला हवे! ‘मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना' सारख्या ओळी आपल्या इच्छांचे आदर्श झाले पाहिजे. आपल्या सामाजिक, राजकीय जीवनातील विसंगती दूर करणे हा आता आपल्या इच्छाशक्तीच्या प्राधान्याचा कार्यक्रम व्हायला हवा. जपानची वस्तू वापरण्याची आपली वृत्ती जाऊन जपानची कार्य संस्कृती आपल्या इच्छेचे प्रतीक झाली पाहिजे. पाटीच टाकू या पण ती भरून टाकू या' इतकी छोटी व्यक्तिगत इच्छाही या देशात संपूर्ण क्रांती घडून आणू शकेल असे मला वाटते. या तर, आपण सर्व जण इच्छाशक्तीस सामूहिक रूप देऊ, तिचा चेहरा विधायक बनवू. तिचे धड राष्ट्रीय कसे होईल ते पाहू. तिचे पाय आंतरराष्ट्रीय गतीने कसे नाचतील ते पाहू. असे झाले तरच एकविसाव्या शतकात आपण तरू शकू. इच्छाशक्ती वापराचे नवे तंत्र, नवा मंत्रच या देशास नवी ओळख देऊ शकेल. देशाने माझ्यासाठी काय केले विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो अशी पृच्छा, इच्छा जागवणे, वापरणे यातच आपले नि देशाचे हित सामावलेले आहे.

आकाश संवाद/२९