पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजी-आजोबांशी मैत्री

 हिंदी कथा साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा. जीवनाचे सर्वांगी चित्रण या साहित्यात आढळते. हिंदीत उषा प्रियंवदा नावाच्या एक कथालेखिका आहेत. त्यांची एक कथा प्रसिद्ध आहे. ‘वापसी' तिचे नाव. ‘वापसी' म्हणजे घरी परतणे. या कथेचे नायक आहेत एक आजोबा. गजाधरबाबू त्यांचे नाव. ते स्टेशनमास्तर होते. सारे जीवन बदलत गेले. पण आपल्या कुटुंबाला त्यांनी कधी नोकरीच्या बदलीची झळ लागू नाही दिली. गजाधरबाबूंचे एक स्वप्न होते. निवृत्त व्हायचे नि मुला-नातवांत उत्तरायुष्य कंठायचे. त्यांनी घर बांधले. मुला-मुलींना शिकवले. लग्ने केली. संसार थाटून दिला. निवृत्त होऊन घरी आले तर त्यांच्या लक्षात आले की घरात ते उपरे आहेत. अडगळ आहेत. एका छोट्या नोकरीचे निमित्त करून ते घर सोडून आल्या पावली परतले. भारतीय घरातील आजी-आजोबाही. तसे पाहिले तर म्हातारपण हे दुसरे बालपणच असते म्हणे! हे लक्षात घेऊन मुले, सुना, नातवंडांनी त्यांना समजून घ्यायला हवे. त्यांच्याशी मैत्री करायला हवी. फार माफक अपेक्षा असतात त्यांच्या त्यांना हवी असते आपुलकी. प्रेमाचा संवाद. थोडेसे त्यांच्याकडे पाहणे! आणि खरं तर त्यांचं अस्तित्व आदरपूर्वक मान्य करणे! पण आपण तेही नाही करत. परिणाम आजी आजोबा आपल्याच घरात पाहुणे बनून जातात. हे त्वरित थांबायला हवे. त्यासाठी गरज आहे, आपली भूमिका बदलायची. आपण त्यांच्यात आपले प्रतिबिंब पहायला हवे. आपणही उद्या आजी-आजोबा होणारच ना? आपणाला आजी-आजोबा झाल्यावर लोकांनी कसे वागवावे वस्तुपाठ आपण आपल्या आचरणाने घालून द्यायला हवा.

 आज जगभर आरोग्य सुविधा वाढल्यात. तुलनेने आहार चांगला झालाय. सरासरी स्वास्थ्यही उंचावलेय आपले. त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य वाढलेय. पूर्वीच्या तुलनेत आजी-आजोबांची संख्या वाढली. पण दुसरीकडे एकत्र

आकाश संवाद/३०