पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मकारणाप्रमाणे समाजकारण, राजकारणातही इच्छाशक्ती वापराचे महत्त्व मानलं गेले आहे. कोणताही प्रश्न अथवा समस्या सोडवायची तर तशी इच्छाशक्ती असावी लागते. अलीकडे ‘पोलिटिकल विल' शब्द वारंवार वापरला जातो. विशेषतः एखाद्या राज्य अथवा देशाच्या कल्याणकारी असण्यासंबंधी धोरण व कृती कार्यक्रमांवर राजकीय इच्छाशक्तीचा मोठा प्रभाव असतो. आज सर्वत्र जागतिकीरणाचे वारे वाहात आहेत. ते राजकीय इच्छाशक्तीचेच अपत्य होय. देशाची धोरणे ही त्या देशाचे नेतृत्व करणाच्या सरकारच्या इच्छेच्या वापराचीच ती फलश्रुती असते. पूर्वी ‘राजा बोले, दल हले' म्हटले जायचे. त्या काळात राजेच्छा प्रमाण मानली जायची. महाराष्ट्रातील इतर संस्थानांच्या तुलनेने कोल्हापूर संस्थान पुरोगामी होते. कारण इथल्या राजर्षी छत्रपती शाहूंच्या इच्छा पुरोगामी होत्या. भारतात संगणक क्रांती आली ती तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या संगणकीय विकास शक्तीमुळे, इच्छेमुळे. रशियात विकेंद्रित लोकशाही आली ती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्या लोकशाही इच्छाशक्तीमुळे.
 विज्ञानात लागलेले सारे शोध त्या वैज्ञानिकांच्या इच्छा नि प्रयत्न सातत्याचेच फलित ना? चाकाचा शोध हा माणसाच्या गतीच्या इच्छेतून लागला नि जगाचा नकाशा बदलून गेला. विज्ञान कधी वरदान ठरतं तर कधी शाप. हे सारे आपण इच्छेचा वापर कसा करतो त्याचाच तो परिणाम असतो. इच्छा ही बाटलीत बंद केलेल्या राक्षसासारखी सुप्त परंतु प्रज्वलनशील असते. तिचे अधिक काळ दमन करून ही चालत नाही. इच्छादमन हे विध्वंसास आमंत्रण असतं. वाट मोकळी करून देणे हा त्यावरचा रामबाण उपाय असतो. अणुमुळे बॉम्बही तयार होतो नि वीजपण. साच्या शोधांची जननी इच्छा असते. द्राक्षातील बी नाहीसे झाले ते छोट्या इच्छेमुळे, पण त्यामागे शास्त्रज्ञांच्या भगीरथ प्रयत्नांची गंगा होती हे आपणास विसरता येणार नाही. पुष्कळ विमानाच्या कल्पनेतून जंबोजेट जन्मले. आपल्या साच्या परिकथा, जादुकळा ह्या माणसाच्या सुप्त इच्छांचेच प्रकट आविष्कार होत. विकासाच्या गतीमागे इच्छेचे घड्याळ सतत टिकटिक करत राहते, हे आपण लक्षात ठेवायला हवे. “कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला' ही काव्यपंक्ती आपणास इच्छासातत्याची महिमाच सांगत असते. इच्छाशक्तीचा वापर दुसरे-तिसरे काही नसून जीवन सातत्यच आहे.
 मरणप्राय माणसास शेवटची इच्छा, हवे नको विचारलं जातं. फाशीपूर्वी अपराध्यास अंतिम इच्छा विचारली जाते. मृत माणसास इच्छाभोजनाचा नैवद्य दिला जातो. या आपल्या साच्या कृती व व्यवहारातून आपण इच्छाशक्तीचेआकाश संवाद/२८