इच्छाशक्तीचा आपण वापर कसा करतो हे महत्त्वाचे. २००१ साली अमेरिकेवर झालेला विमान हल्ला हे इच्छावापराचेच प्रतीक, लादेनने विघातक वापर केला, तर बुशनी स्वदेशी विधायक वापर करून पुनर्बाधणी करून दाखवली. आपणास माकड बनवायचा की माणूस हे ठरवणं महत्त्वाचे आहे.
सामूहिक इच्छाशक्तीच्या वापराचं नवं तंत्र अलीकडच्या काळात जपाननी विकसित केले आहे. त्या देशातील एखादी छोटी कंपनीसुद्धा सामूहिक इच्छाशक्ती वापराच्या तंत्रावरच पाहता-पाहता जागतिक होते. मनुष्यबळ विकासाचे एक नवं शास्त्र आता विकसित होऊ पाहतेय. त्याची सारी उभारणी इच्छाशक्तीवर आधारली आहे. जपानमध्ये नोकरीस घेताना ज्या अनेक चाचण्या घेतल्या जातात, त्यात प्रमुख भर इच्छाशक्तीवर असतो. नोकरीत सतत कार्य करण्याची. अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्याची इच्छाशक्ती जागी ठेवण्यावर भर दिला जातो. 'आयएसओ' सारखी आंतरराष्ट्रीय मानकं निश्चित करण्यात आली आहेत. त्याची महत्त्वाची कसोटी सामूहिक इच्छाशक्ती' मानण्यात आली आहे. व्यवस्थापन शास्त्रात प्रारंभी ‘टीमवर्क' वर भर दिला जायचा. आता ते ‘फॅमिली फिलिंग' शब्दाचा वापर करतात. आपले घर, कुटुंब इच्छाशक्तीवर उभे असते. नवरा-बायकोतील अद्वैत समान इच्छाशक्तीवर टिकते. पुढे मुले, बाळे नि कुटुंब मिळून 'घर' बनते तेही इच्छाशक्तीवर. कमी-अधिक इच्छाशक्ती असलेल्या घर, संस्था, कार्यालय, कारखाने नि देशातच संघर्ष, मतभेद असतात. ‘समान शीले व्यसनेषु सख्यं' सारखी सुभाषिते आपणास समानधर्मी इच्छाशक्तीचंच महत्त्व पटवतात.
धर्मशास्त्रसुद्धा इच्छेचे गोडवे गाते. माणसाचे मन विषय वासनेत गुंतलेले असते. कामेच्छा ही व्यक्तिगत जीवनातील सर्वाधिक शक्तिशाली प्रेरणा मानली जाते. धर्मशास्त्र तिच्या उदात्तीकरणाबद्दल आपणास समजावतं. काम ही विषय इच्छा मानली गेली आहे. धर्म आपणास ऊर्ध्वगामी बनवतो, म्हणजे व्यक्तिगत इच्छेचे सामाजिक उन्नयन करतो. मनुष्य अंतर्मुख असतो. तो जोवर आपल्या इच्छा ‘स्व' केंद्रित ठेवतो तोवर तो अधोगामी असतो. इच्छा ‘परहिताय' होणे म्हणजे मनुष्य विकास, परहित हाच परम धर्म होय. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सरसारखे षड्रिपू धर्म आणि नीतीशास्त्रात विषय इच्छा असल्याने निषेधार्ह मानल्या गेल्या आहेत. जग उभारायचं तर इच्छाशक्तीचा बहिर्गामी विस्तार व्हायला हवा. केंद्रोत्सारी इच्छा उच्चप्रतीची असते. कारण तीत अणुविभाजनासारखी गुणाकारीय शक्ती सामावलेली असते. म्हणून आपण आपल्या व्यक्तिगत इच्छांचे सामाजिक उन्नयन आणि वापर करण्याची वृत्ती जोपासायला हवी.