पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येते की जग सात खंडांमध्ये विभागलेले आहे. ते म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, यूरोप व ऑस्ट्रेलिया. या सर्व खंडांमध्ये जे शेकडो देश आहेत, त्या प्रत्येकाची स्वतःची भाषा, लिपी, साहित्य, संस्कृती आहे. शिवाय पोषाख, रीतिरिवाज, खानपान परंपरा आहेत. निसर्ग जितका वैविध्यपूर्ण आहे, तसे संस्कृतीच्या संदर्भात जगही वैविध्यपूर्ण आहे. मला भारत फिरत असताना नेहमी असं जाणवतं की भारत ही जगाची छोटी प्रतिकृती आहे.

प्रश्न - विविधतेतून एकता हीच का?

उत्तर - गटेनी ही मूळ संकल्पना मांडली होती. गटेकडून प्रेरणा घेऊन कवींद्र रवींद्रनाथ टागोर यांनी 'विश्वभारती'ची संकल्पना मांडली होती. विसाव्या शतकाच्या प्रारंभी त्यांनी ही कल्पना शांती निकेतन, विश्वभारती विद्यापीठाच्या स्वरूपात साकारली. त्यांनाही असे वाटायचे की भारत एकात्म व्हायचा तर भारतातील सर्व भाषा, साहित्य, कला, लिपी, संस्कृती यांचा अभ्यास व्हायला हवा. जेव्हा त्यांनी शांती निकेतनची स्थापना केली तेव्हा किंवा विश्वभारती सुरू केली तेव्हा त्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये सगळ्या कला, संगीत, भाषा, साहित्य शिकविण्याची व्यवस्था केली होती. त्या त्या क्षेत्रांतील दिग्गजांना त्यांनी आपल्या विश्वभारतीत आणलं होतं. साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर हिंदीचा चांगला शिक्षक पाहिजे म्हणून त्यांनी डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांना आणले होते. अशी एक दृष्टी घेऊन त्यांनी काम केले. पुढे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्रात साने गुरुजींनी ‘आंतरभारती'ची संकल्पना विशद केली होती.

प्रश्न - आंतरभारती'च्या माध्यमातून साने गुरुजींनी जे प्रयत्न केले ते विस्ताराने सांगाल का?

उत्तर - आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला वाढ दिवस होता १५ ऑगस्ट, १९४८ ला. त्या दिवशी साने गुरुजींनी साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्या आपल्या साप्ताहिकामध्ये त्यांनी एक सदरच सुरू केले होते. त्याचं नाव होतं ‘प्रांतभारती'. पुढे मग स्वातंत्र्यानंतर आपण भाषावर प्रांत रचनेचे धोरण स्वीकारले. तेव्हा प्रांत विचार त्यांना संकुचित वाटू लागला.

आकाश संवाद/१२२