पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वास वाटतो. “आजी आजोबांशी मैत्री' सारखे भाषण या तुटलेल्या जीवांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल.
 वर्तमान समाजात दोन घटक अनाथ झाले आहेत. - बालके व वृद्ध. ज्या अवस्थेत डोळ्यांत तेल घालून संगोपन करायची गरज असते नेमक्या त्याच वेळी या दोन्ही अवस्था समाजात उपेक्षितांचे जिणे जगत आहेत. भरल्या घरात मुलं अनाथ आहेत. समृद्ध घरात वृद्ध उपेक्षित जीवन कंठत आहेत. शिकलेले आई-वडील घरी बसणं कमीपणाचे मानून दुहेरी मिळकतीमागे धावत आहेत. प्रत्येकास कांचनमृग, मिडास व्हायचे आहे. या धुंदीत त्यांची मुले पाळणाघरात मोठी होत आहेत. प्रेम सोडून त्यांना सर्व काही असणे म्हणजे प्राणवायूशिवाय जगणं! वृद्धांना आया, दाया आहेत. हितगुज करणारे, मायेने हात फिरवणारे कोणी नाही. त्यांच्याकडे पाहण्यास या गतिमान युगात कुणास उसंत नाही. हे आपल्या समाज अस्वास्थ्याचे दर्शन होय! ‘बालकांचे हक्क' ‘अनाथांचा अंत्योदय' सारखी भाषणे याचे भान देतील. यासाठी गरज आहे, ‘इच्छाशक्ती' सामाजिक आणि प्रगल्भ करण्याची, इच्छाशक्तीचा समाजशास्त्रीय व मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार व विकास न झाल्याने समाजात नवनवी अरिष्टे निर्माण होत असल्याची जाणीव या भाषणातून तुम्हास होईल, तर वर्तमान प्रश्न व समस्यांची सोडवणूक करण्याची जादूची कांडीच तुमच्या हाती येईल, पण ही भाषणे वाचणे व त्यानुसार कृती करणे ही त्याची पूर्वअट आहे, हे आपणास विसरून चालणार नाही.
 आज आपण भौतिक समृद्धीच्या एका नव्या मायाजालात जगत आहोत. १९४७ साली भारत स्वतंत्र होताना महात्मा गांधींनी रामराज्याची कल्पना केली होती. अगदी तसे जरी नसले, तरी भारतीय समाजाचे सन १९४७ चे चित्र व आजची स्थिती यात भौतिक समृद्धी उंचावली आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. पण गरीब-श्रीमंतांमधील दरी मात्र आपणास दूर करता आली नाही, हे मान्यच करावे लागेल. श्रीमंत अधिक श्रीमंत झालेत आणि गरीब अधिक गरीब. ही विषमता जागतिकीकरणामुळे आणखी जीवघेणी बनत आहे. पैसा परमेश्वर मानू लागलेल्या समाजास मूल्यांचे देणे-घेणे राहिलेले नाही. रोज मूल्ये रसातळास जाताना आपण पाहात आहोत. हे सारे कांचनमृग होण्याच्या वेडातून घडते आहे. माणसाचा क्रौंचवध होतो आहे, ययाति होतो