पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिलं पत्र तुम्हाला आठवते का? माणसाच्या जीवनात पहिल्या गोष्टींचे असाधारण महत्त्व असते. ज्याला आपण माणसाचं कॅटलाइटिक इव्होल्युशन (Catalytic Evolution) म्हणतो... एक काहीतरी निमित्त होतं नि माणसाच्या जीनात उत्क्रांती होते... भूक लागते नि मग भूकेचं महत्त्व कळते. मग स्वतःचं पोट भरलं तरी दुस-याच्या भुकेचा विचार करू लागतो. कारण त्याला भुकेचे महत्त्व उमगलेलं असते, जाणीव झालेली असते. तसे समाजातील छोट्या छोट्या विकासाच्या पाऊलखुणा आपण जपत गेल्या पाहिजेत. म्हणजे एक साधी गोष्ट आपण पहातो की एकेकाळी धुळपाटी होती. आता आजच्या पिढीला धुळपाटी असा शब्द सांगितला तर ते एवढा मोठा आऽऽ वासतील की विचारायची सोय नाही. या धुळपाटीचं वर्णन एस्. एम्. जोशींची आत्मकथा ‘मी एस्. एम्.' मध्ये आहे. 'मला कोकणात असताना धुळपाटीवर बसवलं त्यात त्यांनी धुळपाटीचे वर्णन केलेय. काय वर्णन आहे? तर एक पेटी असायची. त्या पेटीत वाळू किंवा माती भरलेली असायची. मुलांना त्या वाळू वा मातीवर अक्षरं गिरवायला शिकवले जायचे. अक्षरं गिरवून झाली की ती वाळू, माती सपाट/प्लेन केली जायची. परत बोटांनी अक्षरं त्यावर गिरवायची. ही माणसाच्या लेखन विकासाची पहिली पायरी होय. ती गेली नि स्लेट पाटी आली. म्हणजे दगडी पाटी, पेन्सिलनी आपण स्लेटवर लिह, गिरवू लागलो. पेन्सिल गेली. आता डॉट आले. डॉट गेले. आता डिजिटल स्लेट आली. स्लेट ते डिजिटल पाटी असा लेखन विकास आपण जपायचा की नाही? धुळपाटी ते डिजिटल बोर्ड/स्लेट आपण जपलं पाहिजे.

प्रश्न - सर, तुम्ही हे स्वतः केले आणि समाजानंही ते करावे अशी तुमची अपेक्षा आहे. मला वाटतं ९९% लोकांचं आपल्या वरील प्रश्नांची उत्तरे नाही अशीच असतील. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाही, त्या वस्तूही आमच्या संग्रही नाहीत.

उत्तर - त्याचं कारण आपल्या शिक्षणानी या गोष्टी आपणास शिकवलेल्या नाहीत. आपण इतिहास शिकलो पण इतिहास म्हणजे काय ते नाही शिकलो. खरं इतिहास म्हणजे जतन अशी मी त्याची व्याख्या करत आलो आहे. लोक विचारतील की तुम्ही म्हणता तसे सर्व जपायचं म्हटले तर विकास कसा होणार? तर रिप्लिका करता येतात, रूपांतर करून वस्तू जपता येतात. जुन्या वस्तुंची नवी मांडणी करता येते. म्हणजे पाटाचा डायनिंग टेबल आला. पण पाट जपला तर विकासाच्या पाऊलखुणा उमजणार.

आकाश संवाद/१०६